पुणे: लाडक्या गणरायाच्या उत्सवाला 132 वर्षांनी राज्याश्रय मिळाला आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने शहरातील प्रत्येक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आली आहे. जगाच्या कानाकोपर्यांत पोहचलेला पुण्याचा गणेशोत्सव हा समाजप्रबोधनाचा उत्सव व्हावा, अशी भावना गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 26) दैनिक ‘पुढारी’च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहराच्या कानाकोपर्यासह उपनगरांतून मोठ्या प्रमाणात मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत आपली मते मांडली. (Latest Pune News)
श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती-कोथरूडच्या सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, निंबाळकर तालीमचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश पवार, पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर गायकवाड, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीकांत शेटे म्हणाले, मिरवणूक हा गणेशोत्सवातील सर्वोच्च बिंदू आहे. मात्र, फक्त मिरवणुका म्हणजे गणेशोत्सव नाही. मिरवणूक महत्त्वाची आहे. मात्र, श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून दहा दिवसांत वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यावरही भर देण्याची आवश्यकता आहे. दहा दिवसांचा उत्सव साजरा करताना नेमके आपण समाजाला काय दाखवणार आहोत, याचाही विचार होण्याची गरज आहे. मंडळांच्या बैठकांमधून एकमेकांच्या कल्पनांचे आदान-प्रदान झाल्यास अधिक चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होईल.
रासने म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाने मिरवणुका लवकर संपण्यासाठी मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही चार वाजता मिरवणूक काढण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने शहरातील सर्व मिरवणूक मार्गावरील मंडळांनी मिरवणूक लवकर काढण्यावर भर द्यावा.
जेणेकरून मोठ्या प्रमाणात समस्या सुटतील. तर, पुण्याचा गणेशोत्सव 132 वर्षांचा झाला आहे. त्यास 132 वर्षांनी गणेशोत्सवाला राजाश्रय मिळाला. त्याचा जास्तीत जास्त फायदा सर्व गणपती मंडळांना मिळण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने शासनाने नियम करावेत. त्यासाठी शासनाने मंडळांकडून माहिती मागवावी.
’राज्य शासनास मंडळे सर्वतोपरी सहकार्य करतील. गणेशोत्सव सर्वसमावेशक व्हावा तसेच मंडळांचे प्रश्न सुटण्यासाठी दै. ’पुढारी’ने सातत्याने पाठपुरावा करावा. जेणेकरून मंडळांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील,’ असे माळवदकर यांनी नमूद केले.
मिरवणुकीत सुसूत्रता आणण्याची गरज
गणेशोत्सव जसा श्री गणेशाचा आहे तसाच तो सामाजिक प्रबोधनाचाही आहे. मिरवणुकीत सुसूत्रता येण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. राज्य उत्सव असलेल्या गणेशोत्सवाची संस्कृती, परंपरा जगाला दाखविताना, डीजेचा अतिरेक दाखविताना प्रत्येकाला विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही शेटे यांनी सांगितले.