पुणे: वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतपुरवठा खंडित झाल्याने अंत्यविधीसाठी वेटिंगची वेळ मृतांच्या नातेवाइकांवर गुरुवारी (दि. 22) आली. त्यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले.
नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी ही मुख्य स्मशानभूमी आहे. उपनगरातून नागरिक अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीला प्राधान्य देतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. अशातच गुरुवारी सकाळी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. (Latest Pune News)
त्यामुळे विद्युत दाहिनीतील अंत्यसंस्कार ठप्प झाले. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर महापालिकेने पाचपैकी तीन विद्युत दाहिन्या जनरेटरच्या साहायाने सुरू केल्या. मात्र, जनरेटरच्या साहायाने सुरू केलेल्या विद्युत दाहिनीत अंत्यविधीत विलंब होत असल्याने अंत्यसंस्कारसाठी आलेल्या नातेवाईकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.
याबाबत महापालिकेच्या कर्मचार्यांकडे नागरिकांनी विचारणा केली असता, आम्हाला पूर्वकल्पना न देता देण्यात अचानक वीज पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगितले, तर कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचार्यांनी थेट लाकडांवर अंत्यविधी करा, असा सल्ला दिल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनिषा शेकटकर यांना विचारणा केली असता त्यांनी महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. अत्यंविधीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने पाचपैकी तीन विद्युत दाहिनी या जनरेटरवर सुरू केल्या. त्यानंतर दुपारी दोननंतर वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर अन्य ठिकाणी अंत्यविधी सुरू करण्यात आले.
महापालिकेला पूर्वसूचना न देता महावितरणने वीज पुरवठा खंडित केला. पण या दोन्ही संस्थांमध्ये समन्वय नसल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला. अनेक तास अंत्यविधीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले आहे. भविष्यात असे प्रकार टाळले पाहिजेत, यासाठी प्रशासनाने उपाय योजना कराव्यात.
- गणेश नलावडे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कसबा मतदारसंघ विधानसभा