पुणे: पुणे शहरातून वाहत असलेल्या नवीन मुठा कालव्याच्या दोन्ही बाजूस झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हाधिकार्यांना पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि पोलिस यांच्या सहकार्याने अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी दिली.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात दिसत असलेली अतिक्रमणे तातडीने काढण्यात येणार आहेत. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने पुन्हा कुठे-कुठे अतिक्रमणे झाली आहेत, याचा शोध घेण्यात येणार आहे. (Latest Pune News)
खडकवासला साखळी धरण प्रकल्पातून नवीन मुठा कालव्याची सुरुवात होऊन तो इंदापूरपर्यंत वाहत आहे. खडकवासलातून ते फुरसुंगीपर्यंत सुमारे 34 किलोमीटर असून, शहरातून वाहणार्या या कालव्यावर गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.
गेल्या काही दिवसांत सारसबाग येथे असलेल्या कालव्यावर एका राजकीय संघटनेने ताबा ठोकला आहे. त्याच्यासमोरच राजकीय वरदहस्ताने गायीचा गोठा सुरू केला करून अतिक्रमण केले आहे तर शिंदेवस्ती येथील बेबी कालवा बुजवून त्यावर रस्ता बनविण्यात आला आहे.
याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी जलसंपदा विभागाकडे केल्या आहेत. मात्र, अधिकार्यांनी याकडे कायमच दुर्लक्ष केले. परिणामी, अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता मात्र खुद्द जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनीच लक्ष घालले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दिसत असलेली अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
राजकीय वरदहस्तांमुळेच वाढली अतिक्रमणे
नवीन मुठा कालव्यावर गेल्या काही वर्षांपासून झालेली अतिक्रमणे ही केवळ स्थानिक राजकीय वरदहस्तामुळेच झाली आहेत. तसेच सारसबागेसमोर असलेल्या मंदिराच्या पाठीमागील जागेवर गायीचा गोठा, मंदिर समितीने कालव्या कठड्यावर मारलेला ताबा, समोरच एका राजकीय संघटनेने उघडलेले कार्यालय हे केवळ राजकीय वरदहस्त असल्यामुळेच अतिक्रमण झालेले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.