वडगाव मावळ : वडगावात साडे अकरा हजार बांधकामे अनधिकृत

Published on
Updated on
Wadgaon-Maval-Wadgaon-half-eleven-thousand-constructions-unauthorized

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : वडगाव शहरामध्ये सुमारे साडे अकरा हजार बांधकामे अनधिकृत असताना कारवाई मात्र एकट्यावरच का असा सवाल करून ही कारवाई आकसापोटी होत असल्याचा आरोप अ‍ॅड..धनंजय काटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

वडगाव नगरपंचायत प्रशासनाने अँड.तुकाराम काटे यांच्या मालकीच्या काटे असोसिएटस व काटे हॉस्पिटल या इमारती विनापरवाना बांधली असून संबंधित अनधिकृत बांधकामे एक महिन्याच्या आत पाडून टाकावीत अशी कायदेशीर नोटीस 23 मार्च 2022 रोजी पाठवली होती, त्या नोटिशीची मुदत 22 एप्रिलला संपत आहे. दरम्यान, याबाबत काटे यांनी मुबंई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे.

दरम्यान, ही कारवाई केवळ आकसापोटी केली जात असल्याचा आरोप काटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला, वडगाव शहरातील सर्व बांधकामांसदर्भात नगरपंचायतकडून लेखी माहिती घेतली असता नगरपंचायत हद्दीत सुमारे 12 हजार बांधकामे आहेत. यापैकी तब्बल 5 हजार बांधकामांच्या नोंदीच झालेल्या नाही, तर 7 हजार बांधकामाच्या नोंदी झालेल्या आहेत.

नोंदी झालेल्या 7 हजार बांधकामांपैकी पीएमआरडीए कडून परवानगी घेतलेली 465 व भोगवटा प्रमाणपत्र असलेली 54 तसेच नगरपंचायत परवानगी असलेली 54 व भोगवटा प्रमाणपत्र असलेली 40 अशी एकूण 624 बांधकामे अधिकृत आहेत.

म्हणजेच उर्वरित 6 हजार 376 बांधकामे व नोंदीच झाली नसलेली 5 हजार बांधकामे अशी सुमारे साडे अकरा हजार बांधकामे ही सद्यस्थितीत अनधिकृत आहेत.

तसेच, आमच्यावर कारवाई करताना जुना मुंबई पुणे महामार्ग नियंत्रण रेषेचा निकष लावून कारवाई केली जात आहे. परंतु शहरातील मुख्य बाजारपेठेतील असंख्य बांधकामे ही थेट रस्त्यालगत आहेत,

तर काही नवीन कामांना रीतसर परवानगीही दिली आहे. त्यामुळे शहरात सुमारे साडे अकरा हजार बांधकामे अनधिकृत असताना व मुख्य बाजारपेठेत असंख्य बांधकामे अनधिकृत असताना फक्त एकट्यावरच कारवाई का असा सवाल काटे यांनी केला.

दरम्यान, नगरपंचायतने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी नोटीस प्रसिद्ध केली असून त्यानुसार आमचे बांधकाम अधिकृत करण्यासाठी अर्ज करणार असल्याचे काटे यांनी सांगितले.

'त्या' नगरसेवकांवर कारवाई होणार का ?

दरम्यान, नगरपंचायत निकषानुसार ग्रामपंचायत काळात झालेली सर्व बांधकामे अनधिकृत ठरवली जात आहेत. त्यामुळे बहुतांश जुनी घरे ही अनधिकृत असून यामध्ये नगरपंचायत मधील जवळपास सर्व नगरसेवकांची घरे अनधिकृत आहेत. मग 'त्या' नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार का असा सवाल करून अशा नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज दिला असल्याचेही काटे यांनी सांगितले.

शहरातील बहुतांश बांधकामे ही जुनी असून ग्रामपंचायत काळात झालेली, संबंधित बांधकामाची कुठलीही कागदपत्रे नगरपंचायतकडे नाहीत. काटे यांनी त्यांच्या बांधकामासाठी परवानगी मागितली तेव्हा त्यांनीही कुठलीही कागदपत्रे दिली नाहीत. काटे यांच्या मिळकती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती मागवली असता ही मिळकत बाधित असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार काटे यांना कारवाई संदर्भात नोटीस पाठविण्यात आली, त्यामुळे आकसापोटी कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही.
-जयश्री काटकर, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news