Pune Elections: लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत सुमारे पाच टक्के मतदान वाढल्याचे समोर आले आहे. विधानसभेच्या तुलनेत आतापर्यंत पहिल्यांदाच मतांचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात 61.05 टक्के मतदान झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 21 पैकी 12 मतदारसंघांत मतांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्या उलट पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि कोथरूड मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे.लोकसभेच्या तुलनेत मावळ, दौंड, भोसरी, शिरूर, खेड-आळंदी आणि जुन्नर या मतदारसंघामध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान विधानसभा निवडणुकीला झाले.
तर इंदापूर, भोर, पुरंदर, आंबेगाव आणि खडकवासला या मतदारसंघात पाच ते दहा टक्क्यांदरम्यान मतदानाचे प्रमाण वाढले आहे. त्या उलट पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि कोथरूड मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे.
पुण्यात खूप वर्षांनंतर प्रथमच विधानसभेला मतदानाचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून मतदार नोंदणीसाठी सुरू असलेले जनजागृतीचे प्रयत्न, मतदार याद्याबाबत अत्यल्प तक्रारी होत्या. तसेच महिला, कामगार, आयटी क्षेत्र, तरुण वर्गाला मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत पाच लाख 13 हजार 843 इतके, तर लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत सात लाख 93 हजार इतक्या मतदारांनी अधिक मतदान केले आहे.
लोकसभा निवडणुकीत कमी प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळे कमी मतदान झालेली साडेआठ हजार केंद्रांपैकी अडीच हजार केंद्रे शोधून काढण्यात आली होती. त्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या, तेच 93 टक्के मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे यंदा विधानसभेला पाच टक्क्यांनी मतदान वाढले ही समाधानाची बाब आहे.
मतदानाचा अनुभवी आनंदी व्हावा अशी निवडणूक आयोगाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार, वृद्ध, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, पिण्याच्या पाण्याची, पार्किंगची व्यवस्था, रांगेत बसण्यासाठी खुर्च्या, मदतीसाठी बीएलओची उपलब्धता अशा सुविधा देण्यात आल्या होत्या, याकडे लक्ष वेधण्यात आले.