कोल्हापूर ः काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून मतदाना दिवशी बुधवारी (दि. 20) माझ्यावर दोन वेळा जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप महायुतीचे उमेदवार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. आचारसंहिता असतानाही पाटील यांनी कसबा बावडा येथे कार्यकर्त्यांसमोर भाषण करून हिशेब चुकता करू, अशी धमकी देऊन भावना भडकविल्या. त्याविषयी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख यांच्याकडे तक्रार करणार आहे. दरम्यान, मी षंढ नसल्याचे आव्हानही त्यांनी पाटील यांना दिले.
क्षीरसागर म्हणाले, टाकाळा येथे नागरिकांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी रस्ते, गटार आदी सुविधांचीही वाणवा असल्याचे सांगितले. यावेळी चर्चा करताना काही व्यक्तींनी मोबाईलमध्ये शूटिंग घ्यायला सुरू केले. विचारणा केल्यावर सुमारे 20 ते 25 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हातात लाकडी दांडके घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला. मला वाय प्लस सुरक्षा असली तरी मतदान असल्याने घेतलेली नाही. फक्त अंगरक्षक होता. त्याने मला वाचविले. हल्ल्यात मला काही झाले नाही; पण अंगरक्षकाला लागले. अंगरक्षकामुळे मी तेथून बाहेर पडू शकलो. कसबा बावडा येथे शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव यांच्यासह दुपारी नागरिकांना भेटण्यासाठी गेलो असता ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यांने जाधव यांचा गद्दार असा उल्लेख केला.
जाधव यांनी कार्यकर्त्याची गळपट्टी पकडून त्याला जाब विचारला. मी दोघांना बाजूला करून सोडविले. तेथून आम्ही मिसळ खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेल्यावर सुमारे 150 ते 200 जणांचा जमाव चाल करून आला. आमच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच अनेकजण बावड्याकडे येऊ लागले. परंतु आम्ही सुरक्षित असल्याचे सांगून न येण्याचे आवाहन केले. मी संयम बाळगला. त्यामुळे अनर्थ टळला, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आ. जयश्री जाधव, सत्यजित कदम, भाजपचे महेश जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे व राहुल चव्हाण उपस्थित होते.