Pune Elections: जिल्ह्यातील 21 विधानसभा निवडणुकीची होणारी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या शनिवारी (दि. 23) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 465 फेर्या होणार असून, दुपारी तीनपर्यंत निकाल स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
पुरंदर मतदारसंघासाठी सर्वाधिक म्हणजेच 30 फेर्या, तर आंबेगाव मतदारसंघासाठी सर्वात कमी म्हणजेच 19 फेर्या होणार आहेत. एका फेरीसाठी साधारण 20 मिनिटे लागणार आहेेत. यासाठी निवडणूक विभागाने 2023 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट आणि मग ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरुवात होईल.
जिल्ह्यात 61.50 टक्के मतदान झाले आहे. शहरातील आठही विधानसभा मतदासंघाची मतमोजणी कोरेगाव पार्कमधील फूड कॉर्पोरेशन इंडियाच्या गोदामात होणार आहे. तर पिंपरी, भोसरी मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडीतील क्रीडा संकुलात, तर चिंचवड मतदारसंघातील कामगार भवनमध्येे होणार आहेत.
शिरूर मतदारसंघातील मतमोजणी रांजणगाव एमआयडीसीत होणार असून, उर्वरित ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी कर्मचार्यांना 19 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 24 टेबल ठेवण्यात आले आहेत. 21 मतदारसंघासाठी ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी 391 टेबल, तर पोस्टल मतासाठी 87 टेबल आणि इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेटसाठी 28 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
एका टेबलसाठी दोन पर्यवेक्षक, तीन सहायक असे पाच मतमोजणी कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक नेमून देण्यात आला आहे. मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी या वेळी केली जाते. सुरुवातीला टपाली मते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट मते मोजली जाणार आहेत.
प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. स्ट्राँग रूम तसेच मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. तेथील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. स्ट्राँग रूममधून ईव्हीएम बाहेर काढताना आणि मतमोजणीनंतर परत ठेवतांना व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात येणार आहे.
फेरीनिहाय मोजणीची घोषणा करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी स्ट्राँग रूमला केंद्रीय सशस्त्र दल, राज्य राखीव पोलिस दल आणि स्थानिक पोलिस अशी त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था असणार आहे.
54 लाख 53 हजारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य
जिल्ह्यात 88 लाख 49 हजार 590 मतदार आहेत. बुधवारी झालेल्या निवडणुकीत 54 लाख 53 हजार 176 मतदारांनी म्हणजेच 61.62 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यातील 28 लाख 54 हजार 698 पुरुष मतदार होते, तर 25 लाख 98 हजार 282 महिला मतदार होत्या. या मतदारांच्या हाती जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदासंघांतील 303 उमेदवारांचे भवितव्य असणार आहे.