

पंढरपूर : आषाढी यात्रेत भाविकांना, वारकर्यांना कोणत्याही सुविधेची उणीव भासू नये. विशेषत: महिला भाविकांना स्नानाची व्यवस्था, हिरकणी कक्ष, आरोग्य व्यवस्था, पोलीस बंदोबस्त यावर्षी दुपटीने वाढवला आहे. येथे येणार्या मायबाप भाविकांना प्रशासनाकडून देण्यात येणार्या सेवा-सुविधा पुरेशा प्रमाणात मिळतात का नाही याची पाहणी करण्यासाठी आलो. तेव्हा भाविकांनी चांगल्या सेवा-सुविधा मिळत असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रशासन भाविकांना केंद्रबिंदू माणून काम करत आहे. त्यामुळेच यंदाची आषाढी वारी ही सुरक्षित, स्वच्छ, सुंदर आणि निर्मल वारी ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले.
उपमुख्यमंत्री शिंदे हे पंढरपूर येथे आषाढी यात्रेपूर्वी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सेवा-सुविधांची पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी केल्यानंतर त्यांनी विश्रामगृहात पत्रकरांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री गिरीश महाजन, आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गतवर्षी मी आषाढी वारीत भाविकांना देण्यात येणार्या सेवा-सुविधांबाबत सूचना दिल्या होत्या. यावर्षीही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आजपाहणी केली.
प्रशासनाने आरोग्य, स्वच्छता याबाबत चांगले काम केले आहे. दर्शन रांगेतील भाविकांना अगोदर 15 तास दर्शनासाठी थांबावे लागत होते. मात्र, जिल्हा प्रशासन व मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करुन तसेच सूक्ष्म नियोजन करुन भाविकांना सुलभ व जलद दर्शनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे भाविकांना आता 5 ते 6 तासातच दर्शन मिळत आहे. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. वारी काळात पाऊस झाला तर चिखल होऊ नये म्हणून 15 कोटी रुपये खर्च करुन मुरुमीकरण केले. आरोग्यसेवेच्या 4500 किट भाविकांना वितरित केल्या आहेत. गतवर्षीपेक्षा दुप्पट सुविधांमध्ये वाढ केली आहे.
भाविकांचे आरोग्य जपण्याला प्राधान्य दिले जात आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. चंद्रभागेत 190 बोटी तैनात आहेत. भाविकांना 15 लाख मिनरल वॉटर पुरवण्यात येत आहेत. शहरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेर्याव्दारे पोलीस यंत्रणा गर्दीवर नियंत्रण ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.
मी देखील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे पायी चालत आलो. खरे तर व्हीआयपी कोण आहे तर वारकरी हे व्हीआयपी आहेत. मी वारकरी म्हणून आलो. भाविकांना देण्यात येणार्या सेवासुविधांचा आढावा घेतला. प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.