आशिष देशमुख
पुणे: वातावरणातील नवीन विषाणू, जल, वायुप्रदूषणासह अन्नपदार्थातील भेसळ आता सहज शोधणे शक्य होणार आहे. कारण, पुण्यातील शास्त्रज्ञांनी तशा प्रकारचे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
उच्च दर्जाच्या नॅनो पार्टिकलपासून कमी खर्चाचे कनफाइंड डिवेटिंग नावाचे तंत्रज्ञान त्यांनी भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत विकसित केले आहे. पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान संस्था (आयसर) आणि आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी हे अनोखे तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे. (Latest Pune News)
राष्ट्रीय विज्ञान संस्था पुणे आणि आयआयटी मुंबई येथील सुमारे आठ शास्त्रज्ञांनी मिळून हा शोध लावला आहे. यात आयशा रहमान (आयसर, पुणे), विजित गांगुली (आयआयटी मुंबई), सुदीप्त मजुमदार (आयसर, पुणे), साग्निक चटर्जी (आयसर, पुणे), अविनाश महापात्रा (आयसर पुणे), आशना बाजपेयी (आयसर पुणे), अनिर्बान सैन (आयआयटी, मुंबई), प्रा. डॉ. अतिकुर रहमान (भौतिकशास्त्र विभाग, आयसर, पुणे) या शास्त्रज्ञांचा या संशोधनात सहभाग आहे.
नेमके काय आहे संशोधन?
संशोधकांनी धातूचे उच्च दर्जाचे नॅनोकण तयार करण्यासाठी कमी खर्चात एक नवी पद्धत विकसित केली आहे. या संशोधनाचे तपशील स्मॉल मेथडस् या शास्त्रीय नियतकालिकेत प्रकाशित झाले आहेत. ‘कनफाईंड डिवेटिंग’ नावाची ही अभिनव पद्धत अत्यंत संवेदनशील आणि विश्वसनीय संवेदक तयार करायला मदत करू शकते.
यामुळे जैववैद्यकीय निदान आणि रासायनिक क्षेत्रांमध्ये या पद्धतीचा व्यापक उपयोग होऊ शकतो. या शोधकार्याचे नेतृत्व आयसर पुणे येथील आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाऊंडेशनमधील संशोधक डॉ.आयेशा रहमान, आयआयटी मुंबई मधील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. अनिर्बान सेन आणि आयसर पुणे मधील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. आतिकुर रहमान यांनी केले.
रामन इफेक्ट तंत्रज्ञानाचा फायदा
संशोधकांनी एक अधःस्तर म्हणून (सिलिकॉनचा) थर आधारित लवचिक पदार्थ) यांच्या मध्ये सोने, चांदी यांचा एकत्रित वापर करीत धातूचा पातळ थर तयार केला. यारचनेला 200 ते 300 अंश सेल्सिअस तापमानावर तापवले यात धातू वितळून त्याचे नॅनोकण तयार झाले.
हे एक एक सारख्या आकाराचे तयार झाले. यात त्या कणांची घनता आणि आकार खूप कमी झाला. प्रत्येक पदार्थाला रामन सिग्नल असतात. हे नॅनोकण जेव्हा या तंत्रज्ञानातून वापरले तेव्हा असे लक्षात आले की, कोणतेही विषाणू, प्रदूषण, अन्नपदार्थातील भेसळ सहज शोधणे शक्य आहे. कारण हे सिग्नल अतिशय वेगाने मिळाले.
काय आहे कनफाइंड डिवेटिंग तंत्र?
सपाट, वक्र पृष्ठभागांवर किंवा अगदी सूक्ष्म रचना असलेल्या स्तरांवर एकसारखे आणि उच्च घनता असलेले धातूचे नॅनोकण तयार करण्याची एक सोपी, पण प्रभावी पद्धत शोधण्यात यश आले आहे. कनफाइंड डिवेटिंग तंत्र काही नॅनो स्तरावरील रचना निर्माण करायच्या पद्धतींमध्ये (फॅब्रिकेशन) वापरले जाते.
यामध्ये एखाद्या काचेच्या स्लाइडवर द्रवपदार्थ असतो आणि त्यावर आणखी एक थर रचलेला असतो, ज्यामुळे द्रवाला मर्यादित म्हणजेच कनफाइंड, जागा मिळते. द्रवपदार्थ अधःस्तराला ओले करण्याऐवजी त्यावर उपलब्ध मर्यादित जागेत आकसत जातो आणि त्या द्रवपदार्थाचे लहान एकसमान थेंबांमध्ये किंवा अतिसूक्ष्म कणांमध्ये विघटन होते.