

पुणे: जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड भागात संततधार, तर उर्वरित भागात मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, घाटमाथ्यावर अतिमुसळधारा कोसळत होत्या. या पावसाने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला असून, निरा, भीमा, मुळा-मुठा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या (बुधवारी) नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुसळधार पावसामुळे डेक्कन क्विन दोन दिवस बंद राहणार असून, मुंबईत पडणार्या पावसामुळे पुण्याहून मुंबईला जाणार्या आणि पुण्याहून पास होणार्या रेल्वेच्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द होणार असल्याचे सांगण्यात आले. (Latest Pune News)
सोमवारी दिवसभर जिल्ह्यात मध्यम, तर शहरात संतधार पाऊस झाला. सायंकाळी थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, सोमवारी रात्री पुन्हा पावसाला सुरुवात झाली, तो पाऊस मंगळवारी दुपारी एक वाजता काहीवेळ थांबला. त्यानंतर पुन्हा दिवसभर पाऊस सुरूच होता. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत शहरात सरासरी 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर जिल्ह्यातील काही भागांत 30 ते 80 मि. मी. पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली.
राज्यात सर्वाधिक पाऊस ताम्हिणी घाटात झाला असून, तेथे 24 तासांत 320 मि. मी. पावसाची नोंद झाली.दरम्यान, खडकवासला धरणसाखळीतून मंगळवारी सायंकाळी 5 वाजता 30 हजार क्युसेक, तर रात्री 8 नंतर 35 हजार क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याने शहरातील नदीपात्रासह सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, भिलारेवाडी परिसरातील नागरिकांची धडधड वाढली आहे. या भागात मंगळवारी सायंकाळपासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोणावळ्यात 189 मिलीमीटर पावसाची नोंद
पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगर आणि मावळ तालुक्यात मंगळवार (दि. 19) सलग दुसर्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. लोणावळ्यात मंगळवारी दिवसभरात 189 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
मंगळवार सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. पवना नदीच्या पात्रात मावळातील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. शंकरवाडी पुलाखाली पाणी साचले होते. चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिर परिसरात पवनेचे पाणी शिरले.
मावळात मंगळवार सकाळपासूनच घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. जोरदार पावसामुळे लोणावळ्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती. तालुक्यातील देहूगाव, पवनानगर, तळेगाव परिसरातही जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली होती. मावळातील धरणे भरली असून, त्यातून विसर्ग करण्यात येत आहे; तसेच पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले भुशी धरण पुन्हा ओव्हर फ्लो झाले आहे.
निरा, पानशेत, भीमाशंकर-आहुपे खोर्यात गेली दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे बहुतांश धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सध्या 105.25 टक्के क्षमतेने भरले आहे. या सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे निरा, भीमा, मुळा-मुठा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे पानशेत तसेच सिंहगड भागात दरड तसेच झाडे कोसळली. दरम्यान, संततधार पावसामुळे खरिप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे.
पानशेत भागातील घोल खिंडीत दरड कोसळली. तसेच सिंहगड किल्ल्याच्या परिसरात मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या परिसरात काही ठिकाणी झाडेदेखील पडली.
घाटमाथ्यावर झालेला पाऊस (मि.मी.) (रात्री 7 पर्यंत)
ताम्हिणी 320, लोणावळा 189, शिरगाव 210, वाळवण 102, आंबोणे 196, भिवपुरी 81, दावडी 255, डोंगरवाडी 271, कोयना 151, पोफळी 215, खंद 62, धारावी 235.
शहरातील पाऊस...
शिवाजीनगर 41.4, पाषाण 23.3, लोहगाव 44.8, चिंचवड 41.5, लवळे 52.5, हडपसर 35
जिल्ह्यातील पाऊस..
गिरिवन 82, तळेगाव 43, हवेली 31.5, डुडुळगाव 27, निमगिरी 25.5, राजगुरुनगर 24.5, माळीण 8, दौंड 5.5, मगरपट्टा 5, बारामती 4.8.