

Hadapsar Sahyadri Hospital Vandalism Negligence Pune:
पुणे : हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संतापलेल्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. रुग्णावर योग्य उपचार केले नाहीत म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी रागाच्या भरात दगडफेक व तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होता. त्याच्यावर योग्य उपचार केले नाहीत, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. रुग्णाची प्रकृती अचानक बिघडल्याने नातेवाईकांनी रागाच्या भरात हॉस्पिटलची तोडफोड केली.
काही लोकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु नातेवाईकांचा गोंधळ वाढला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ बाहेर पडणेही अवघड झाले होते. अशा प्रकारच्या घटना पुण्यात तसेच राज्यभरात पाहायला मिळत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचा ताण, उपचारांबाबत निर्माण होणारी असुरक्षितता आणि संवादाच्या अभावामुळे अशा घटना घडत आहेत.
नेमके काय घडले?
उपचारादरम्यान रुग्ण दगाविल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनावर आरोप करुन तोडफोड केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तोडफोड प्रकरणात काही जणांना ताब्यात घेतले. हडपसर भागातील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल झाला होता. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी रुग्णाचे नातेवाईक आवारात जमले. डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगाविल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी दुपारी बाराच्या सुमारास तोडफोड करण्यास सुरुवात केली. रुग्णालायच्या काचेच्या दरवाज्यांवर दगडफेक करण्यात आली, तसेच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय माेगले यांनी घटनास्थळी भेट दिली.