School Bus Accident Pune: स्कूल बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; फरार बसचालकावर सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा
पुणे : वडगाव कॅनॉल समोर सिंहगड रस्त्यावरील फनटाईम सिनेमा गृहाचे जवळ भरधाव स्कुल बसने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
मंगळवारी (दि.9) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बाबुराव पांडुरंग पांगारे (65, रा. पोकळे वस्त, धायरी) असे अपघाती मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत पोलिस अमंलदार गौतम शिवाजी कांबळे यांनी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी श्रीमंत निलप्पा माळी (65, रा. सिंहगड कॉलेज क्वाटर्स, वडगाव बुद्रुक) या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी बाबुराव पांगारे हे फनटाईम सिनेमागृहाजवळून पायी जात असताना त्यांना भरधाव वेगात असलेल्या आयशर बसने जोरदार धडक दिली.
धडकेत गंभीर जखमी झालेल्या पांगारे यांचा मृत्यू झाला. अपघात केल्यानंतर चालक अपघाताची खबर न देताच पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सिंहगडरोड पोलिस करत आहेत.

