

वडगाव शेरी: विमाननगरमध्ये कचरा घेण्यासाठी महापालिकेची यंत्रणा असतानाही एक खासगी कचरा वाहतूकदार (कचरा माफिया) हॉटेल व्यवसायाकांकडून दररोज कचरा घेत आहे. त्यानंतर तोच कचरा महापालिकेच्या गाड्यांमध्ये दिला जात आहे. यातून कचरा माफिया दरमहा लाखो रुपये कमावत आहे. आरोग्य विभागाच्या दुलर्क्षामुळे कचरा माफिया मालामाल होत असून, हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
महापालिका प्रशासन विमाननगर ‘स्वच्छ आणि सुंदर’ करण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. नागरिक आणि व्यावसायिकांकडून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांनी ओला-सुका कचरा घेऊन तो महापालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्रात घेऊन जाणे अपेक्षित आहे. परंतु, विमाननगरमध्ये प्रत्यक्षात असे काम होताना दिसत नाही. हॉटेल व्यावसायिक आणि मोठ्या सोसायट्यांकडून महापालिकेच्या घंटागाड्यांनी कचरा घेऊ नये, अशी व्यवस्था एक कचरा माफियाने केली आहे.
यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. याचा फायदा उठवत संबंधित कचरा माफिया व्यावसायिकांकडून दरमहा 30 ते 50 हजार रुपये घेऊन त्यांच्या कचरा गोळा करतो. त्यांनतर हा कचरा महापालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्रात दिला जातो. जे काम महापालिका मोफत करते, त्याच कामासाठी कचरा माफिया व्यवसायिकांकडून पैसे उकळत असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहिती आहे. मात्र, राजकीय दबावामुळे या कचरा माफियावर कारवाई होत नाही. या प्रकारामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेचे विमाननगर परिसर स्वच्छ ठेवण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कचरा माफिया आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विमाननगरमधील आरोग्य विभागातील एका निरीक्षकाने खासगी कचरा वाहतूक करणारी एक गाडी गेल्या 24 मार्च रोजी पकडली होती. पण त्या गाडीवर अद्यापही कारवाई झाली नाही. याबाबत वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, प्रशासनाकडून गेले दीड महिन्यापासून कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. कचरा माफियाला पाठबळ देणाऱ्या आरोग्य निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
करीम शेख, सामाजिक कार्यकर्ते
खासगी कचरा वाहतुकदाराची तक्रार माझ्याकडे आली आहे. त्यांसदर्भात मी संबधित विभागाची बैठकही घेतली होती. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले असून, चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
संजय पोळे, सहाय्यक आयुक्त, नगर रोड विमाननगर क्षेत्रीय कार्यालय