Pune Doctor Negligence: खोरमध्ये शस्त्रक्रियेनंतर तरुणीचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर गंभीर आरोप

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अतिरक्तस्राव; 22 वर्षीय रंजना केसकर यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ आणि संताप
Doctor negligence case
Doctor negligence casePudhari
Published on
Updated on

खोर: खोर (ता.दौंड) येथील एका विवाहित महिलेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे संसाराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या रंजना बाबू केसकर (वय २२, रा. खोर, ता. दौंड) यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Doctor negligence case
Pune Arms License Cancellation: पुणे पोलिसांचा धडाका; 289 शस्त्र परवाने रद्द, 476 अर्ज फेटाळले

मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी दि.२५ रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी रंजना केसकर या सकाळी उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. सकाळी सुमारे नऊच्या सुमारास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला.

Doctor negligence case
New TB Vaccines: क्षयरोगाविरुद्ध नवी लस प्रभावी; VPM1002 आणि Imuvacचा दिलासा

स्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ नीलिमा लोखंडे यांनी रंजना यांना तातडीने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. उच्च रक्तदाब कमी न झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. रंजना बरोबर स्वतः कार्डीयक ॲम्ब्युलन्स मध्ये डॉ नीलिमा लोखंडे ह्या देखील होत्या. मात्र तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रंजनाची प्रकृती अधिकच खालावली. अखेर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खोर व परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. निष्काळजीपणे शस्त्रक्रिया करून एका तरुणीचा जीव घेतल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

Doctor negligence case
Maharashtra TET Exam 2026: महाराष्ट्र टीईटीसाठी विक्रमी नोंदणी; सहा लाख उमेदवार परीक्षा देणार

दोन लेकरांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरपले...

रंजना या अवघ्या २२ वर्षीय असून त्यांच्या पश्चात पती बाबू केसकर, दोन वर्षांचा मुलगा पियूष आणि एका वर्षाची मुलगी आरोही, सासू, सासरे असा परिवार आहे. संसार नुकताच मार्गी लागत असताना आईच्या निधनाने दोन निरागस लेकरांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरपले आहे. पती व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलगी आरोही हिचा पहिला वाढदिवस मंगळवारी होता. मात्र पहिलाच वाढदिवस पाहायला आरोहीची आई जगात राहिली नसल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.

Doctor negligence case
Pune Crime: लग्नास नकार; तरुणीचा पाठलाग करत जीवे मारण्याची धमकी

आरोग्य विभागासमोर प्रश्नचिन्ह...

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियांची सुरक्षितता, उपलब्ध साधनसामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि रुग्णांवरील उपचारांची गुणवत्ता याबाबत या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारी ही घटना असल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रशासन काय भूमिका घेणार?...

रंजना केसकर यांचे सर्व कुटुंबीय सोमवारी दिवसभर यवत पोलिस ठाण्यात बसून होते. एवढा गंभीर प्रकार होऊन देखील यवत पोलिस ठाण्यात केसकर कुटुंबाकडून या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले असून या प्रकरणी अधिकृत चौकशी सुरू होणार का, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का, आणि मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. खोर गावातील रंजनाचा संसार अर्ध्यावरच मोडला, मात्र तिच्या मृत्यूला जबाबदार कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news