धोकादायक इमारतीत भरणाऱ्या शाळेचे ग्रामस्थांनी केले स्थलांतर  

धोकादायक इमारतीत भरणाऱ्या शाळेचे ग्रामस्थांनी केले स्थलांतर  
Published on
Updated on
कात्रज : पुढारी वृत्तसेवा : गुजर-निंबाळकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारतीत शाळा भरत होती. ग्रामस्थांनी सातत्याने जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नव्हत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी बुधवारी (ता. 29) विद्यार्थ्यांचे महापालिकेच्या करसंकलन कार्यालयात (जुने ग्रामपंचायत कार्यालयात) स्थलांतर केले. सुरक्षित जागेत शाळेचा वर्ग भरल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर सुरक्षा आणि आनंद स्पष्ट दिसत होता.
शाळेच्या खोल्या धोकादायक असल्याचा अहवाल चार वर्षांपूर्वी देऊनही महापालिका नवीन खोल्या बांधण्यासंबंधी पाऊल उचलत नव्हती. तसेच, जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाकडून शाळेसंबंधी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात येत होती. सरकारी फितीत या शाळेच्या धोकादायक वर्गखोल्यांचा निर्णय अडकल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत होते. या गंभीर समस्येकडे 'दैनिक पुढारी'ने लक्ष वेधले होते.
करसंकलनासाठी महापालिकेकडून वापरण्यात येणार्‍या खोल्या ग्रामपंचायत काळात बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळेसाठी या तीन वर्गखोल्या रिकाम्या करून मिळण्याबाबत शालेय व्यवस्थापन समितीकडून ठराव करण्यात आला होता. ग्रामस्थांकडून सातत्याने गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, महापालिका आयुक्त, कोंढवा-येवलेवाडीचे सहायक आयुक्त यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात येत होती.
परंतु, ही मागणी मान्य होत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी करसंकलन कार्यालयाला कुलूप लावत दुसर्‍या खोलीत शाळेची मुले बसविली. विद्यार्थी पालकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी माजी सरपंच दीपक गुजर, गणपत गुजर, माजी उपसरपंच गणेश काळे, गणेश निंबाळकर, अजित निंबाळकर, पप्पू गुजर व नागरिक उपस्थित होते.
जिल्हा परिषद आणि पालिका अधिकार्‍यांना आमची मुले धोकादायक इमारतीत शिक्षण घेत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपुढे हतबल होऊन शेवटी आज आम्हाला करसंकलन कार्यालयाला टाळे ठोकत या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसवावे लागले. महापालिकेने  शाळेसाठी आम्हाला नवीन वर्गखोल्या बांधून द्याव्यात.
–  दीपक गुजर, माजी सरपंच, गुजर-निंबाळकरवाडी
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news