

सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीला पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळते. परंतु, सत्तेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला सरपंच व उपसरपंचपद मिळावे, नावापुढे सरपंच लागावे म्हणून चक्क तीन महिन्याला सरपंच बदलण्याचा प्रकार खेड तालुक्यातील दावडी गावात सुरू आहे.
राज्यघटनेत गावचा मुखिया, प्रमुख म्हणून सरपंचपदाला खूप महत्त्व दिले आहे. सरपंचपद हे शोभेचे पद नसून, गावविकासाला दिशा देण्याचे काम या पदाचे असते. ग्रामपंचायतीचा कारभार कसा करायचा, हे समजले म्हणजे राज्याचा कारभार शिकण्यासारखे असते, असे बोलले जाते. सरपंच झालेल्या व्यक्तीला गावचा कारभार समजण्यासाठी किमान सहा महिने तरी जावे लागते. त्यानंतर वर्षभर केवळ अंदाज घेण्यात जातो. यामुळे सरपंच झालेल्या व्यक्तीला खरेच चांगले काम करायचे असेल, गावविकास करायचा असेल तर किमान अडीच वर्षे तरी मिळाले पाहिजेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या पॅनेलची सदस्यसंख्या अधिक त्याचा सरपंच होतो. पण, हे सरपंच, उपसरपंचपदाचा कार्यकाळ ठरवताना निवडून आलेल्या लोकांनी आपली सोय पाहिली. यात अनेक गावांमध्ये सरपंच, उपसरपंचपदाचा बाजार मांडला जात आहे. पाच वर्षांसाठी निवडून दिलेल्या व्यक्ती ही पदे उपभोगण्यासाठी अडीच वर्षांसाठी, एक वर्षासाठी, सहा महिन्यांसाठी पदे वाटून घेतली. पण, खेड तालुक्यातील दावडी ग्रामपंचायतीने या सर्वांवर मात करीत चक्क तीन महिन्याला सरपंच बदलण्याचा प्रताप केला आहे.
एखाद्या गावात तीन महिन्याला वेगळा सरपंच झाल्यास गावविकास होणे कठीण आहे. सरपंच हा गावचा प्रमुख असतो आणि त्याला गावविकासासाठी योजना तयार करणे, अंमलबजावणी करणे आणि लोकांचे प्रश्न सोडविणे यासारखी कामे करावी लागतात. वारंवार सरपंच बदलल्यास कामात सातत्य राहणार नाही, विकासकामांमध्ये अडचणी येणार, योजना अपूर्ण राहणार, अशा अनेक अडचणी येऊ शकतात.
आमची दावडी ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्यसंख्या असून, सत्ताधारी गटाचे 8 सदस्य आहोत. प्रत्येक सदस्याला सरपंच होण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही सर्वांनी मिळून तीन-तीन महिने सरपंचपद घेण्याचे ठरविले. विकासकामे निश्चित केल्यानुसार केली जातात. पद बदलले तरी मागील सरपंचाने ठरविलेले काम पुढचा सरपंच पूर्ण करतो. यामुळेच विकासकामे करताना कोणतीही अडचण येत नाही.
संतोष सातपुते, विद्यमान सरपंच, दावडी