

पुणे : पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटचे विलीनीकरण पुणे महानगरपालिकेत होण्याबाबत बर्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यात आता महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. अशातच पुन्हा दोन्ही कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनीकरण होण्याबाबत चर्चा सुरू आहे. यासंदर्भात उद्या गुरुवारी (दि. 10) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विलीनीकरणासंदर्भात बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके काय निर्णय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या हद्दीतील नागरी परिसराचे महानगरपालिका किंवा नगरपालिकेत विलीनीकरण करण्यात यावे याबाबत चर्चा सुरू आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे विकास कामे करण्यासाठी निधीची कमतरता तसेच संरक्षण विभागाच्या नियमावलीमुळे अडचणी येतात. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमधील भागात विकासकामे करण्यास अडचणी येतात.
पुण्यात पुणे, खडकी व देहू कॅन्टोन्मेंट ही तीन कॅन्टोन्मेंट मंडळे आहेत. या कॅन्टोन्मेंटमधील नागरी भाग हा महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला यासंदर्भात कॅन्टोन्मेंट प्रशासनासमवेत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापालिका प्रशासनाने डिसेंबर महिन्यात पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसोबत तसेच लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डातील लोकसंख्या, मिळकती, कर्मचारी, तसेच त्यांचे वेतन, निवृत्तीवेतन यासह विविध बाबींवर चर्चा केली होती. यानंतर महापालिकेने कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट करत राज्य शासनाला अहवाल दिला होता.
कोर्टाने आदेश दिल्यामुळे सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. ही तयारी सुरू असताना राज्य सरकारने देखील कॅन्टोन्मेंट विलीनीकरणाबाबत आढावा घेतला होता. याबाबत पुन्हा उद्या गुरुवारी (दि 10) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत कॅन्टोन्मेंट विलीनीकरण करण्याबाबत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॅन्टोन्मेंट विलीनीकरण संदर्भात राज्य व केंद्र सरकारमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. असे झाल्यास लष्करी भाग वगळून उर्वरित नागरी भाग महापालिकेत समाविष्ट होणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी केंद्राचे कर्मचारी असल्याने त्यांच्या वेतनश्रेणी आणि सेवानिवृत्तीचे वय वेगवेगळे आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 362, तर खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये 345 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचार्यांचा समावेश कसा होणार, तसेच लष्करी भाग कसा वगळावा यावर काय निर्णय होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.