

पुणे : जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या दोन महिन्यातील पर्जन्यवृष्टीमुळे भीमा नदीच्या उपखो़-यांतील मध्यम आणि मोठ्या 26 धरण प्रकल्पामध्ये एकूण 74 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी नऊ जुलैला या सर्व धरणांत केवळ 14 टक्के पाणीसाठा होता. म्हणजे जवळपास पाचपट पाणीसाठा झाला आहे.
पावसाळ्यातील जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांतील पाऊस अद्याप पडायाचा असल्याने, यंदा अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. धरणांत पाणी अडविण्यासाठी जागा असावी, म्हणून 26 पैकी 13 धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे.
भीमा उपखो़-यातील धरणे मुख्यत्वे पुणे जिल्ह्यात आहेत. राज्यातील सर्वांत मोठ्या उजनी धरणाची भिंत जरी सोलापूर जिल्ह्यात असली, तरी त्याचे जलाशय पुणे जिल्ह्यात आहे.
उजनी धरण गेल्या वर्षी 9 जुलै रोजी शून्य पातळीच्या खाली उणे 38 टक्के होते. उजनी धरणात 90% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उजनीतून 14 हजार क्युसेक्स पाणी नदी आणि कालव्यात सोडण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यात मुठा खोरे, नीरा खोरे, कुकडी खोरे आहे. त्या व्यतिरिक्त भीमा आणि इंद्रायणी नदीवर धरणे आहेत. मुठा खो?यातील खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत 20 टीएमसी (68 टक्के) पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून गेले तीन आठवडे मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. या काळात खडकवासला धरण दोनवेळा भरेल एवढे म्हणजे 4.84 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे.
नीरा खोर्यातील चार धरणात ही 70 टक्के पाणीसाठा झाला आहे तेथील वीर धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी थेट नीर नरसिंगपूर मार्गे पंढरपूरकडे जाते.कुकडी खोर्यातील धरणे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भरतात. त्यातील एकूण सात धरणात 54 टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र घोड धरण 94% भरल्यामुळे त्यातून अडीच हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. ते उजनी धरणाच्या जलाशयात जाते.
पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 76 टक्के भरले आहे. त्यातून 2300 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. भीमा नदीवरील चासकमान धरण ही 80% भरल्याने त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भामासखेड 59% तर आंद्रा धरण 95 टक्के भरले आहे.
कृष्णा उपखोर्यातील तेरा धरणे सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आहेत. या धरणातही एकूण 70 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी तो 30 टक्के होता येथील 13 पैकी 11 धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे कोयना धरण 50 टक्के भरले आहे.