

पुणे : "अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी आयुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी निवाऱ्याची महत्त्वाची गरज जेव्हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचेल तेव्हा विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल.
विकसित भारतामध्ये प्रगत तंत्रज्ञान, बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे मोलाचे योगदान राहणार आहे," असे प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुनील भिरुड यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पुणे सेंटरतर्फे 'बिल्डर्स डे'निमित्त 'विकसित भारत २०४७ : बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे योगदान' या विषयावरील ज्ञानसत्रात डॉ. भिरुड बोलत होते. हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित कार्यक्रमात संवर्धन मदरसन ग्रुपचे महासल्लागार व वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव कपूर, बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीएआय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष महेश मायदेव, उपाध्यक्ष राजाराम हजारे, सचिव सी. एच. रतलानी, कोषाध्यक्ष डाॅ. महेश राठी, कार्यक्रमाचे संयोजक शिवकुमार भल्ला आदी उपस्थित होते.
डाॅ. सुनील भिरुड म्हणाले, "तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग प्रचंड असून, २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना अंतराळप्रवास आणि मंगळ, चंद्र येथील मानवी वसाहतींचा विचार केला जाईल. अधिकाधिक स्मार्ट साधने, स्मार्ट सामग्री असेल. या वेळी 'बीएआय'च्या वतीने बांधकाम क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक केडगे, लक्ष्मण थिटे, एस. बी. थोरवे, युसुफ इनामदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच संजय बोरकर, गीता नगरकर, अधिरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एसकेएफजी रिअॅलिटी लिमिटेड, विंडसर इन्फ्राकाॅन व जयंत इनामदार यांना सदस्यत्व बहाल करण्यात आले. 'बीएआय'च्या नवीन डायरीचे प्रकाशन झाले. 'बीएआय' बांधकाम व्यावसायिक, बांधकाम कामगार व त्यांची मुले यांच्यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे अजय गुजर यांनी प्रास्ताविकात सांगितले. लक्ष्मण थिटे, अशोक केडगे यांनी मनोगत मांडले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एच. रतलानी यांनी आभार मानले.