

पुणे : महापालिकेच्या शाळेतही गुणवान खेळाडू असतात. अर्थात, त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. मात्र, अशा प्रशिक्षण कार्यक्रमामधून देशाला भविष्यात चॅम्पियन खेळाडू मिळतील, अशी भावना बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केली.
पूना गेम फाउंडेशन व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमसी शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या एअरबॅडमिंटन उपक्रमाचे उद्घाटन प्रकाश पादुकोण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पीएमसीच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बरवे, लोकमान्य सहकारी पतपेढीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, आयकर विभागाचे मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर, योनेक्सचे विवेक झाडू, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, उपाध्यक्ष सुशील जाधव, कोषाध्यक्ष सारंग लागू, क्रीडा विभाग प्रमुख माणिक देवकर, पीडीएमबीएचे सचिव सीए रणजीत नातू, राजीव बाग, शिक्षण क्रीडा अधिकारी उपस्थित होते.
पदुकोण म्हणाले, महापालिका अशा प्रकारे मुलांना बॅडमिंटनचे प्रशिक्षण देत असल्याचे मी पहिल्यांदाच बघतो आहे. खरी गुणवत्ता अशाच शाळांमध्ये असते. मात्र, त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे असे खेळाडू पुढे येऊ शकत नाहीत. मात्र, या प्रशिक्षण मधूनच पुढे देशाला चॅम्पियन्स खेळाडू मिळू शकतील. सध्या या उपक्रमात एक लाख मुले असून, ३२ शाळांमध्ये सुरू होत आहे. भविष्यात सर्वांना सामावून घ्यावे. ज्यामुळे बॅडमिंटन खेळाचा प्रसार आणि प्रचार होईल. केवळ चॅम्पियन बनण्यासाठी खेळू नका. कारण खेळ तुम्हाला शिस्त, जबाबदारी, वेळेचे व्यवस्थापन, संघ भावना शिकवतो आणि तंदुरुस्ती प्रदान करीत असतो.
या वेळी रणजित नातू, वसुंधरा बरवे यांनी ही मनोगत व्यक्त केले. या वेळी पुणे जिल्ह्यातील 32 शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.