

Vijay Shivtare demands separate ward
पुणे: महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महापालिकेत समाविष्ट असलेल्या पुरंदर तालुक्यातील गावांचा स्वतंत्र प्रभाग करण्यात यावा, अशी मागणी आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीत या भागातून 25 हजारांचे मताधिक्य मिळाले असल्याने आपल्याला चांगला फायदा होईल, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या रचनेत राजकीय हस्तक्षेप करायचे नसतात, हे स्पष्ट संकेत असतानाही आमदार शिवतारे यांनी मात्र पुरंदर तालुक्यातील महापालिकेत समाविष्ट गावांचा स्वतंत्र प्रभाग (वॉर्ड) करावा, अशी मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Latest Pune News)
निवडणुकीत या भागातून मला 25 हजारांचे मताधिक्य मिळाले होते, हा भाग आपल्याला मानणारा असल्याने गावांची स्वतंत्र प्रभागरचना करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शिवतारे यांनी केली आहे.
प्रभागांची रचनाही सुचविली
समाविष्ट गावांची नक्की कशी रचना करता येईल, हेसुध्दा शिवतारे यांनी सुचविले आहे. त्यानुसार येवलेवाडी, पिसोळी, उंड्री, वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी या सर्व गावांची लोकसंख्या एकूण 27 हजार 570 इतकी आहे.
तर आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी या गावांची लोकसंख्या 39 हजार 462 इतकी आहे. तर, एकूण लोकसंख्या 67 हजार 32 इतकी आहे. त्यानुसार वरील गावांची लोकसंख्या कमी जास्त करून या गावांचे दोन प्रभाग करणे शक्य असल्याने त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.