इंदापूर: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यात डाळिंबाची प्रतिकिलो 275 रुपये इतक्या उच्चांकी भावाने विक्री झाली. पेरूदेखील प्रति किलो 55 रुपयांनी विकला गेल्याची माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके यांनी दिली.
इंदापूर बाजार समितीचे कामकाज क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बाजार समितीच्या कामकाजाबाबत सभापती जाधव म्हणाले, बाजार समितीमध्ये कांद्याची प्रतिक्विंटल रु. 2200 पर्यंत विक्री झाली. ड्रॅगन फ्रुट प्रतिकिलो रु. 81 ने विकले गेले. (Latest Pune News)
बाजार समितीत खरेदीसाठी आंध्र प्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यातील खरेदीदार येत आहेत. शेतकर्यांना सुविधा देण्यात बाजार समिती अग्रेसर आहे. बाजार समिती मुख्यत: भुसार, डाळिंब, कांदा, मासे (मासळी), पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रुट, फुले या शेतमालासाठी प्रसिद्ध आहे. मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतमाल उघड लिलावाने विक्री, चोख वजनमाप व विक्रीनंतर शेतकर्यांना हिशेबपट्टी, त्वरित रक्कम अदा केली जाते.
बाजार समितीने शेतमालास चांगला भाव मिळावा या उद्देशाने मुख्य बाजार आवारात धान्य सफाई यंत्र सुविधा उभारली आहे. बाजार समितीने शेतमाल तारण योजनाही सुरू केली आहे. बाजार समितीतील सुविधा, योजना व उपक्रमांचा शेतकरी, व्यापारी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
या वेळी संचालक विलास माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, संदीप पाटील, रूपाली वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे, सचिव संतोष देवकर उपस्थित होते.