

Vidyanand Bapat Assault Pune: पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डीजेमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, अशी भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना आज पुण्यातील टिळक रोड परिसरात मारहाण करण्यात आली. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना अचानक एका तरुणाने बापट यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात डीजेच्या वाढत्या आवाजावरून पुण्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विद्यानंद बापट यांनी डीजेला विरोध करताना नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. याच भूमिकेबाबत ते माध्यमांशी बोलत असताना एका तरुणाने अचानक त्यांच्यावर हात उगारला. हल्ला होताच उपस्थितांनी हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला रोखले. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मारहाणीच्या घटनेनंतर विद्यानंद बापट यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अचानक आलेल्या एका व्यक्तीने आपल्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. आपण सशस्त्र नसल्याचे तसेच घटनास्थळी पोलीस असूनही त्यांच्याकडे शस्त्र नसल्याचे पाहून हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
“त्याला फक्त चीप पब्लिसिटी पाहिजे होती. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने हे केलं,” अशा शब्दांत बापट यांनी हल्लेखोरावर टीका केली. पोलिसांनी त्याला चौकीत घेऊन तुडवा, त्याला समजलं पाहिजे मुद्याचं उत्तर मुद्यांनं द्यायला हवं अशी प्रतिक्रिया बापट यांनी दिली. या संपूर्ण घटनेचे पत्रकार आणि कॅमेरे साक्षीदार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मारहाणीप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार का, असा प्रश्न बापट यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेवर काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बापट यांना झालेल्या मारहाणीचा संदर्भ देत त्यांनी सत्ताधारी मंडळींच्या पाठिंब्यामुळे काहींची मजल मारहाणीपर्यंत पोहोचल्याचा आरोप केला.
“सत्ताधारी मंडळींच्या पाठिंब्याने काहींची मजल थेट मारहाणीपर्यंत पोहोचली. पुण्यात भाजपची दादागिरी कशी वाढली, हे याचं उदाहरण,” अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.
दरम्यान, डीजेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याने पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मारहाणीमागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.