विद्या प्राधिकरण राज्यभर राबवणार ‘पहिले पाऊल-शाळापूर्व तयारी अभियान’ 

विद्या प्राधिकरण राज्यभर राबवणार ‘पहिले पाऊल-शाळापूर्व तयारी अभियान’ 

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शाळांमधील प्रवेश सुकर व्हावा, पालकांना शाळा प्रवेशाची माहिती व्हावी आणि मुलांचीदेखील तयारी करून घेता यावी, यासाठी विद्या प्राधिकरण 'पहिले पाऊल-शाळापूर्व तयारी अभियान' असा उपक्रम राज्यभर राबविणार आहे.

राज्यात यंदा अंदाजे 14 लाख विद्यार्थी सरकारी शाळेत (पहिल्या वर्गात) प्रवेश घेणार आहेत. राज्यातील जवळपास 65 हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील 14 लाख बालकांचा पहिलीत प्रवेश करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी मेळाव्यादरम्यान सात प्रकारचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा सामाजिक, शारीरिक, बौद्धिक विकास तपासला जाणार आहे. यामध्ये पालकांना विद्यार्थ्यांकडून आठ ते दहा आठवड्यांत नेमकी कोणती तयारी करावी, याची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी कृतिपुस्तिका, शैक्षणिक साहित्यदेखील तयार करण्यात आले आहे.

उपक्रमादरम्यान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत झटणारे पालक, विशेषत: त्यांच्या माता या केंद्रस्थानी असणार आहेत, हे या अभियानाचं वैशिष्ट्य. यासाठी तब्बल साडेचार लाख मातांचे गट स्थापन करण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत माता गटांना देण्यात येणारे 'आयडिया कार्ड' वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुलांनी आनंदाने व तयारीनिशी शाळेत यावे, ही एक चळवळ व्हायला पाहिजे. त्यासाठी ग्रामस्थ, तरुण स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक, अधिकारी यांना या उपक्रमात सहभागी केले जाणार आहे.

देशात बालशिक्षणाच्या आद्य प्रवर्तक ताराबाई मोडक यांची जयंती 19 एप्रिलला साजरी झाली. त्यांचे स्मरण करून लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

                                                                  – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

कोरोना काळात मुले अंगणवाडी किंवा बालवाडीत जाऊ शकलेली नाहीत आणि आता थेट पहिलीत ही मुले जाणार आहेत. त्यामुळे शाळेत जाण्याची पूर्वतयारी या मुलांची झालेली नाही हे गृहीत धरून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

                                                    – डॉ. नेहा बेलसरे, उपसंचालक, विद्या प्राधिकरण

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news