

कार्यक्रम कधी : शनिवारी, 18 ऑक्टोबर
कुठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
वेळ : रात्री नऊ वाजता. कार्यक्रम वेळेत सुरू होईल, याची रसिकांनी नोंद घ्यावी.
Pudhari Diwali 2025 Swar Sandhya Pune Event Manjusha Patil
पुणे : शास्त्रीय संगीत हा गायनाचा मूळ पाया आहेच. माझीही पहिली आवड शास्त्रीय गायनच आहे. पण, मी सर्व गायन प्रकारांना महत्त्व देते. गायकाने अभंग, नाट्यसंगीत, ठुमरी, भावगीत गायनाकडेही लक्ष दिले पाहिजे. गायकाने बहुआयामी असले पाहिजे. रसिकांना आवडेल, भावेल असे गायन त्यांच्याकडून व्हायला हवे. रसिकांची दाद ही कलाकारांसाठी खूप महत्त्वाची असते, अशी भावना आग्रा -ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका विदुषी मंजूषा पाटील यांनी व्यक्त केली. (Latest Pune News)
दै. ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. 18 ऑक्टोबर) मंगल स्वरांची सुरमयी मैफल-‘दिवाळी स्वरसंध्या’ हा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहेत. कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर आणि गायिका मंजूषा पाटील यांच्या सुरेल गायकीने दिवाळीची रात्र अधिकच सुरेल होणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने मंजूषा पाटील यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.
कार्यक्रमाचे फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड, तर एज्युकेशन पार्टनर ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहेत. तर, ॲकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आहेत. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक कोहिनूर ग्रुप, अमर बिल्डर्स, नाईकनवरे बिल्डर्स आणि संजय काकडे ग्रुप आहेत.
गुरूंच्या मार्गदर्शनातून काय लाभले?
संगीताचार्य पं. द. वि. काणे ऊर्फ काणेबुवा यांच्याकडून मी तेरा वर्षे गायनाचे शिक्षण घेतले. त्यांनी मला शास्त्रीय संगीताची ओळख करून दिलीच; पण त्या जोडीला त्यांनी मला नटसमाट बालगंधर्व यांचे नाट्य संगीत, मास्टर कृष्णराव फुलंबीकर यांच्या काही रचना, असे गायनाचे परिपूर्ण संस्कार माझ्यावर केले. मूळ शास्त्रीय संगीत मी त्यांच्याकडून शिकलेच; पण इतर संगीत प्रकारांविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. ते स्वत: उत्तम भजन सादरीकरण करायचे. काणेबुवांचे मोलाचे मार्गदर्शन मला मिळालेच, तर ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांचेही गायन संस्कार माझ्यावर झाले. दोघांच्याही मार्गदर्शनाने मी घडले.
पहिल्या मैफलीच्या आठवणींबद्दल सांगाल?
माझी पहिली जाहीर सांगीतिक मैफल 1985 साली वयाच्या 14 व्या वर्षी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात झाली होती. शास्त्रीय ते सुगम अशी ही परिपूर्ण मैफल होती. या मैफलीला 300 ते 350 रसिक उपस्थित होते. रसिकांनी माझ्या गायकीला भरभरून दाद दिल्याची आठवण आजही मनात ताजी आहे.
रसिक कोणत्या गायन प्रकाराला दाद देतात?
मी सादर करीत असलेल्या सर्वच गायन प्रकारांना रसिक भरभरून दाद देतात. रसिकांकडून मी सादर केलेल्या राग-सोहनीला सर्वाधिक दाद मिळते. अभंग गायनात ‘जोहार मायबाप जोहार’ या अभंगाची फरमाईश रसिकांकडून होते, तर खरा तो प्रेमा. या नाट्यगीताची फरमाईशही रसिक करतात. रसिकांची दाद कलाकारासाठी महत्त्वाची असते.
रसिकांकडून मिळणारी दाद किती महत्त्वाची वाटते?
रसिक आहेत म्हणून कलाकार घडतात. कलाकार आपले संगीत शिकत असतात, रियाज करतात, गुरुकृपेने आपली कला ते सादर करण्याचा प्रयत्न करतात, हे करताना रसिक कलाकाराला भरभरून प्रेम आणि दाद देतात, तेव्हा कलेचे सार्थक झाल्याची भावना आम्हा कलाकारांच्या मनात असते. त्यामुळे रसिकांचे प्रेम कायम मिळत राहावे, असेच वाटते. मायबाप रसिकांमुळेच कलाकार आहेत, कलेला दाद देणारे रसिक खूप महत्त्वाचे आहेत. रसिकांसमोर कला सादरीकरणातून कलाकारालाही वेगळे दिव्यत्व प्राप्त होते.
आपल्या आक्रमक गायकीविषयी काय सांगाल?
मी आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याची गायिका आहे. हे घराणे तसे आक्रमकच समजले जाते. आक्रमक गायकी ही आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याचे वैशिष्ट्य आहे. घराण्याचे वैशिष्ट्य असले तरी गायकानुसार त्यामध्ये फरक पडत असतो. कारण, प्रत्येकाची एक स्वभाव प्रकृती असते. गायक खूप शांतताप्रिय असेल, तर त्यांच्या गायकीमध्ये, आलापी, तालेमध्ये आणि लयकारीमध्ये ही शांतता दिसते. शेवटी घराणे म्हणजे गायनाचे वैशिष्ट्य. त्यामुळे आम्हाला गुरुपरंपरेने जे वैशिष्ट्य मिळाले त्यात कलाकाराचे गायन वैशिष्ट्यही दिसायला हवेच. माझा स्वभाव खूप आक्रमक नाही. पण, काही अंशी माझ्या गायनात आक्रमकता येते, ती मला आवडते. तो माझ्या आवडीचा भाग आहे. ही आक्रमकता सुसह्य आहे तिथपर्यंतच चांगली असते. त्याचा आनंद रसिकांना मिळतोय तिथपर्यंतच ती आक्रमकता योग्य आहे. अति होऊ देऊ नये. आक्रमकतेमुळे आपली मेलडी गायनातून जाऊ नये, हा मी सातत्याने प्रयत्न करीत असते. कारण, संगीत म्हणजे मेलडी आहे. मी माझ्या गायनात नेहमी आक्रमकता ठेवून त्यातील मधुरपणाही जपण्याचा प्रयत्न करीत असते.
आजपर्यंतच्या संगीतप्रवासाकडे तुम्ही कसे पाहता?
माझ्या सांगीतिक प्रवासात मला प्रत्येक टप्प्यात जी-जी माणसे भेटली, त्यांनी मला पुढे जाण्यास प्रेरणा दिली आणि पाठिंबा दिला. माझे आई-वडील, गुरूंच्या सोबतीने पाठिंबा देणारे अनेक लोक मिळाले, त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्या माध्यमातून माझा सुरेल प्रवास सुखकर झाला. त्या सुरेल प्रवासाने माझ्यातील गायिका घडवली. माझ्या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी माझ्या मनात कृतज्ञता आणि ऋण आहे. हे ऋण फेडताना उत्तम सादरीकरण करणे, हे मला महत्त्वपूर्ण वाटते.
नव्या पिढीतील कलाकार घडवत आहात, त्याबद्दल सांगाल?
एका कलाकाराला सादरीकरण हा जसा प्रांत असतो, तसे समाजाचे काही देणेही असते. त्यामुळेच याच भावनेतून कला ही प्रवाहित असणे खूप गरजेचे, याच विचाराने माझ्या गुरूंनी दिलेल्या कलेतून मी नवोदित कलाकारही घडवत आहे. त्यासाठी मी 2007 मध्ये पं. द. वि. काणे ऊर्फ काणेबुवा प्रतिष्ठानची स्थापना केली. 2014 मध्ये मी गोविंद बेडेकर यांच्या मार्गदर्शनातून गुरुकुलची स्थापना केली. कारण, विद्यादान व्हायलाच हवे. आता सांगलीमध्ये काकासाहेब चितळे यांच्या नावाने गुरुकुल उभे आहे. येथे नवी पिढी शास्त्रीय संगीतासह संवादिनी, तबलावादनाचे धडे गिरवत आहे. छोट्या गावांमधील कलाकारांनाही घडविण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहोत. गाणे उत्तम ठेवणे, रसिकांना चांगले गाणे ऐकवणे, कायम विद्यार्थी म्हणून गायन शिकत राहणे आणि शिष्यांना उत्तम गायन शिकवणे, हेच माझे उद्दिष्ट आहे
दिवाळी स्वरसंध्या हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांना कोथरूडमधील रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोथरूडवासीयांनी या संगीतमय मेजवानीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपल्या प्रवेशिका राखून ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रवेशिका रसिकांसाठी उपलब्ध झाल्या असून, कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. एका प्रवेशिकेवर एकाच व्यक्तीस प्रवेश असेल आणि प्रथम येणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.
दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयातही रसिकांना कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळणार आहेत. पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील (पाटील प्लाझासमोर) पुढारी कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेशिका मिळतील.
कर्वे रस्त्यावरील देसाई बंधू आंबेवाले येथे सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड यांच्या कोथरूड येथील चार शाखांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 आणि टिळक रस्त्यावरील ग्राहकपेठेत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका मिळतील. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेशिका उपलब्ध असतील. याशिवाय बेडेकर गणपती मंदिराचे सभागृह, कोथरूड येथेही कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळतील. येथे सकाळी 9 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत.
प्रवेशिका ऑनलाइन कशा बुक करता येतील?
रसिकांना कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर गुगल फॉर्म लिंक ओपन होईल आणि त्यानंतर लॉग इन केल्यास वाचकांना प्रवेशिका बुक करता येईल.
प्रवेशिकेसाठी येथे क्लिक करा.