मंचर : पावसाची विश्रांती; ‘कुकडी’त अत्यल्प पाणीसाठा

मंचर : पावसाची विश्रांती; ‘कुकडी’त अत्यल्प पाणीसाठा

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाने विश्रांती घेतल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणार्‍या सर्वच धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा आहे. यंदा धरणांमध्ये 63.11 टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे या वर्षी धरणे भरणार का? याबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम असून, चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील डिंभे, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा या धरणांचा समावेश आहे. या धरणांमुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांसोबतच नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती ओलिताखाली येते. मागील वर्षी 4 जुलै रोजी या धरणांमध्ये एकूण 71.31 टक्के इतका पाणीसाठा झाला होता. मात्र, यंदा धरणांमध्ये 63.11 टक्केच पाणीसाठा आहे.

त्यामुळे येणार्‍या कालखंडात पाऊस किती होतो व धरणे किती भरतात आणि यावरच पुढील पाण्याचे नियोजन ठरणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पेरणी खोळंबली आहे. तर काही ठिकाणी शेती ओली करून पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. तरीही एकंदरीत पावसाची परिस्थिती पाहता दुबार पेरणीचे संकटही शेतकर्‍यांपुढे उभे राहिले आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सर्व शेतकरी जोरदार पावसाची अपेक्षा करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news