

वेल्हे: केळद (ता. राजगड) येथील रायगडच्या हद्दीवरील अतिदुर्गम मढे घाट परिसरात गिर्यारोहणासाठी आलेल्या पुण्यातील मुलांवर मधमाश्यांनी तुफान हल्ला केला. त्यात संयोजकासह 35 जण जखमी झाले आहेत. तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा प्रकार रविवारी (दि. 4) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या वतीने विविध शाळांतील दहा ते पंधरा वयोगटातील मुला-मुलींच्या गिर्यारोहण सहलीचे आयोजन करण्यात आले होते. एका बसने सर्वजण मढे घाट परिसरात रविवारी सकाळी आले होते. त्यावेळी त्यांच्यावर एकाच वेळी भल्या मोठ्या पोळ्याच्या मधमाश्यांनी तुफान हल्ला केला. त्यामुळे ही मुले आडमार्गाच्या खडकाळ अरुंद पायी मार्गाने सैरावैर धावत होती. दाट धुक्यामुळे मुलांना मार्गही सापडत नव्हता. मधमाश्यांच्या दंशामुळे मुलांना मळमळ, उलटी होणे, चक्कर येणे आदी त्रास झाला. अनेकांचे चेहरे सुजले होते. तीव वेदना होत होत्या.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे, धायरी व खेड शिवापूर येथील 108 क्रमांकाच्या सरकारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. वेल्हे रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बोरसे व इतर डॉक्टरांनी तातडीने जखमी मुलांवर उपचार सुरू केले. तेथून जखमींना वेल्हे येथील सरकारी ग््राामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यात 6 जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ग््राामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी पुण्यातील रुग्णालयात पाठवले आहे.
मोठी दुर्घटना टळली
वेल्हे ग््राामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर हिरास म्हणाले, मधमाश्यांच्या हल्यात जखमी झालेल्या 35 मुलांसह तीन पुरुष व एका महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवले आहे. तर रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल बोरसे म्हणाले, मधमाश्यांनी मोठ्या प्रमाणात दंश केल्यास रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. वेळेवर उपचार मिळाल्याने जीवितहानी टळली.
पासलीचे डॉक्टर गायब
घटना घडल्यानंतर केळदजवळील पासली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी काही मुलांना नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टर गायब असल्याने उपचार मिळाले नाहीत. केळदचे माजी सरपंच रमेश शिंदे म्हणाले, पासली आरोग्य केंद्रात 24 तास डॉक्टर हजर नसतात. रविवारी व इतर सुटीच्या दिवशी रुग्णांचे हाल होतात.