

पुणे: मकर सक्रांतीचा सण जवळ आल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात बोरांना मागणी वाढली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे बाजारातील बोरांची आवक रोडावली आहे. रविवारी बाजारात अवघ्या सातशे ते आठशे गोण्यांमधून बोरांची आवक झाली.
गत आठवड्याच्या तुलनेत आवक घटल्याने बोरांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. घाऊक बाजारात बोरांच्या दहा किलोला 120 ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यातील डाळिंबाचा हंगाम संपल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटक, गुजरात येथून डाळींबाची आवक होत आहे.
मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने डाळींबाच्या दरात वाढ झाली आहे. याखेरीज, मोसंबीच्या दरातही वाढ झाल्याचे सांगण्यात आले. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
रविवारी (दि. 4) मोसंबी 25 ते 30 टन, संत्रा 25 ते 30 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, खरबूज 7 ते 8 टेम्पो, चिकू दोन हजार गोणी, पेरु 800 क्रेटस, अननस 6 ट्रक तर बोराची 700 ते 800 पोती आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रतिगोणी) : 150-400, मोसंबी : (3 डझन) : 280-450, (4 डझन) : 280, संत्रा : (10 किलो) : 300-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 100-300, आरक्ता : 20-80, गणेश : 10-40, कलिंगड : 15-25, खरबूज : 15-35, पपई : 10-25, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 300-500, अननस (1 डझन) : 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 300-370, चेकनट 800-950, उमराण 120-150, चण्यामण्या 1200- 1500.