पुण्यनगरीत विसावला पालखी सोहळा; आज दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी

पुण्यनगरीत विसावला पालखी सोहळा; आज दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी
Published on
Updated on

पुणे :

भेदा-भेद भ्रम अमंगळ,
आईका जी तुम्ही भक्त भागवत !!
कराल ते हित सत्य करा !!
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर !!
वर्म सर्वेश्वर पूजनांचे,
तुका म्हणे एका देहांचे अवयव,
सुख दुःख जीव भोग पावे !!
पुणे : पुढारी वृत्तसेवा

टाळ-मृदंगांचा गजर… हाती भगव्या पताका… मुखी 'ज्ञानोबा माउली तुकाराम' असा जयघोष करीत मार्गक्रमण करणारे ज्येष्ठ, तरुण आणि चिमुकले वारकरी… डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, अशा भक्तिमय वातावरणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे सोमवारी पुण्यात आगमन झाले.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सकाळी सव्वासहा वाजता आळंदी येथून, तर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सकाळी आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत पिंपरीमध्ये करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून दुपारी पालखी सोहळा बोपोडी, खडकीकडे निघाला. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि डॉ. कुणाल खेमनार यांनी दुपारी दीड वाजता बोपोडीमध्ये पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता वाकडेवाडी चौकात पोहचला.

आळंदी येथून रविवारी प्रस्थान झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोमवारी सकाळी आळंदीहून निघाली. आळंदीबाहेर सकाळी न्याहारीसाठी सोहळा विसावला. तेव्हा पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी चहा, फळे, नाष्टा देत वारकर्‍यांचे स्वागत केले. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे कळस येथे स्वागत केले. पालखीच्या पुढे असलेल्या दिंडेकर्‍यांचा आणि वीणेकर्‍यांचा त्यांनी सन्मान केला. कळस परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात पालखी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास दाखल झाली.

विश्रांतवाडी परिसरात सामाजिक संदेशपर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या, टाळ-मृदंगांचा ताल, वैष्णवांची झालेली गर्दी अन् ध्वनिवर्धकावर वाजणारी भक्तिगीते अशा भक्तिमय वातावरणात मुकुंदराव आंबेडकर चौक सकाळपासूनच पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दुपारी साडेबाराच्या सुमारास चौकात दाखल झाली, तेव्हा भाविकांनी 'माउली माउली'चा एकच जयघोष केला. पालखीवर पुष्पवर्षाव करण्यात आला. तेथे जागोजागी स्वागत मंडप उभारले होते.

मार्गावर वारकर्‍यांसाठी ठिकठिकाणी चहा, नाष्टा, जेवणाची सोय नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. शिवणकाम, मसाज आदी सोयही केली होती. आदर्श इंदिरानगर येथील श्री क्षेत्र आदर्श पालखी विसावा दत्त मंदिर येथे पालखी विसाव्यासाठी दुपारी सव्वा वाजता थांबली. या वेळी स्थानिक भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अश्व व बैलांचीही विसाव्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. विसाव्यानंतर पालखीने शिवाजीनगरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

दुपारी पावणेचार वाजता पालखी येरवडा परिसरातील स्व. बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे चौकात दाखल झाली. या वेळी परिसरातील नागरिकांची दर्शनासाठी झुंबड उडाली. पालखी संगमवाडी परिसरातील मंडपात दुपारी चारच्या सुमाराला विसाव्यासाठी थांबली. त्यानंतर सोहळा पाटील इस्टेटजवळील चौकात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोहचला. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या पुणेकरांनी 'माउली माउली'चा जयघोष करीत मोठ्या जल्लोषात पुष्पवृष्टी करीत पालखीचे स्वागत केले.

दोन्ही पालखी सोहळे वाकडेवाडी येथून एकामागून एक पुणे शहराच्या दिशेने मार्गस्थ झाले. शिवाजीनगरहून फर्ग्युसन रस्त्यावर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सायंकाळी उशिरा पोहचली. या रस्त्यावरील पादुका मंदिरामध्ये आरती करण्यात आली. त्या वेळी मोठ्या संख्येने वारकरी आणि पुणेकर भाविक उपस्थित होते. संपूर्ण रस्ताच वारकर्‍यांच्या भक्तीने आणि गर्दीने फुलून गेला होता. रस्त्यावरील प्रचंड गर्दीतून रथ हळूहळू पुढे सरकत होते. ठिकठिकाणी दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. त्यानंतर फर्ग्युसन रस्त्याने खंडुजीबाबा चौकातून पालखी सोहळा लक्ष्मी रस्त्यावर पोहचला.

या वेळी पालखीसोबत आलेले वारकरी घाईघाईने आपापल्या मुक्कामाच्या दिशेने जात होते. पालख्या लक्ष्मी रस्त्याने सायंकाळी संथगतीने मुक्कामाच्या दिशेने निघाल्या. संत तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात रात्री 9.35 वाजता मुक्कामासाठी थांबली. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरात रात्री 10.25 वाजता मुक्कामासाठी पोहचला. दोन्ही मंदिरे आकर्षक पध्दतीने सजवली आहेत. दोन्ही मंदिरांत दर्शनासाठी रात्री भाविक पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

आज दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी

सोमवारी रात्री दोन्ही पालख्या पेठांमधील विठ्ठलाच्या मंदिरांमध्ये मुक्कामाला थांबल्या. दुसर्‍या दिवशीही या पालख्या पुण्यात मुक्कामी असतील. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात आज मंगळवारी (दि. 13) मुक्काम करेल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news