

खोर: श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला बुधवार दि. २५ जून रोजी सकाळी ६ वाजता मोठ्या भक्तिभावाने आणि महाआरती करून वरवंड गावकऱ्यांनी निरोप दिला. दरम्यान संपूर्ण गावात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
गेल्या दोन दिवसांपासून पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवत व वरवंड या दोन गावात मुक्कामी होता. सोहळ्याचे थांबे असल्यामुळे दौंड तालुक्यात उत्सवाचे वातावरण होते. वरवंड याठिकाणी रात्री उशिरा पर्यंत व दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेपासूनच भाविकांनी महाआरतीसाठी गर्दी केली होती. रात्रभर हरिनामाच्या गजराने सारा गाव दुमदुमून गेला होता. (Latest Pune News)
महाआरतीनंतर मंगल घोष, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिपाठाच्या जयघोषात पालखी सोहळ्याने पुढील गावी प्रस्थान केले.पुढे वैष्णवांचा मेळा व पालखी सोहळा पाटस येथे न्याहारीसाठी काही वेळ विसावला गेला. त्यानंतर दौंड तालुक्यातील नयनरम्य रोटी घाट मार्ग पार करत पालखी बारामती तालुक्यात प्रवेश केला.
रोटी घाटाचा परिसर हिरवाईने नटलेला असून वारीतील भक्तांना निसर्गाच्या सान्निध्यात भक्तिमय वातावरण अनुभवण्याची संधी मिळाली. वारीचे नियोजन सुरळीत पार पडावे म्हणून पोलिस बंदोबस्त, वैद्यकीय सेवा, स्वच्छता व्यवस्था आणि स्वयंसेवकांचा उत्तम समन्वय ठेवण्यात आला आहे. वारकऱ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत असून, "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
वारकरी संप्रदायाची ही अद्वितीय परंपरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव यांचे प्रतीक ठरत आहे. पालखी सोहळा पुढील गावी मार्गस्थ झाल्यानंतर वरवंड ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. गावामध्ये उभारण्यात आलेल्या जर्मन तंबू मध्ये वारकऱ्यांची चोख व्यवस्था पार पडली गेली. वरवंड गावातून पालखी सोहळ्याने निरोप घेतल्यानंतर गाव अगदी सुने - सुने पडले गेले होते.