

गणेश खळदकर
पुणे: खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना आता विचार करून प्रवेश घ्यावा लागणार आहे. कारण, प्रवेश रद्द करण्याची अंतिम मुदत संपली आणि नंतर विद्यार्थ्याने संबंधित संस्थेतील प्रवेश रद्द केला.
तर, मात्र त्याला अनामत रक्कम वगळता उर्वरित रकमेवर पाणी सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, प्रवेश रद्द करण्यासाठी शैक्षणिक संस्थेमध्ये चकरा न मारता ऑनलाइनच प्रवेश रद्द करता येणार आहे. (Latest Pune News)
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात एक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये विविध नियम दिले असून महाविद्यालयांमधील प्रवेश रद्द करण्यासंदर्भात देखील एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
प्रवेश रद्द करण्यासाठी असलेल्या प्रणालीद्वारे निर्मित अर्जाची यथोचित स्वाक्षरीत प्रत संस्थेला सादर करील. विद्यार्थ्याने एकदा का प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने विनंती सादर केली की, त्यांचा प्रवेश रद्द झाला असे समजण्यात येईल.
विद्यार्थ्याने प्रवेश रद्द करण्यासाठी असलेल्या प्रणालीद्वारे निर्मित अर्जाची स्वाक्षरीत प्रत संस्थेला सादर केलेली असो किंवा नसो, हे विचारात न घेता संस्था, उमेदवाराने प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेली विनंती अंतिम समजणार आहे. अशा प्रकारे प्रवेश एकदा रद्द केल्यावर, उमेदवार त्या जागेवरील हक्क गमावेल आणि अशी जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल.
जर उमेदवाराने सक्षम प्राधिकरणाने जाहीर केलेल्या पूर्ण शुल्क परताव्याच्या प्रवेश रद्द करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी किंवा त्या दिनांकास प्रवेश रद्द केला असेल तर, संस्था, प्रणालीद्वारे निर्मित अर्जाची यथोचित स्वाक्षरीत प्रत संस्थेला सादर केल्याच्या दोन दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्क म्हणून रुपये एक हजार फक्त वजा करून उर्वरित पूर्ण शुल्काचा परतावा संस्थेकडून विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.
तसेच, त्याची सर्व मूळ प्रमाणपत्रे परत करावी लागणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकार्याने ठरवलेल्या प्रवेशाच्या अंतिम तारखेनंतर प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर संबंधित विद्यार्थी प्रतिभूती ठेव व अनामत ठेव याव्यतिरिक्त कोणत्याही शुल्क परताव्यास हक्कदार असणार नाही.
अंतिम दिनांकानंतर प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश रद्द करण्याची लिंक निष्क्रिय करण्यात येईल. गुणवत्ता यादी दिनांकानंतर (कट ऑफ) उमेदवारास संस्थेतील प्रवेश रद्द करण्यासाठी संस्थेकडे अर्ज सादर करावा लागणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी-पालकांच्या अडचणी वाढणार
अनेक विद्यार्थी ठरावीक महाविद्यालयांमध्ये काही रक्कम देवून प्रवेश निश्चित करत असतात. प्रवेश प्रक्रियेतील क्लिष्टपणामुळे प्रवेशाची तारीख संपली तरी त्यांना एका महाविद्यालयातून प्रवेश रद्द करून दुसर्या महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवेश रद्द करण्याची अंतिम तारीख उलटून जाते. आता जर संबंधित तारीख निघून गेली, तर मात्र विद्यार्थ्यांसह पालकांना संबंधित संस्थेत भरलेल्या रकमेला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी- पालकांच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.