पुणे: महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात येत असलेल्या प्रभाग रचनेत आयुक्तांचे अधिकार कमी करून त्यात नगरविकास विभागाच्या वाढत्या हस्तक्षेपाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षासह ‘आप’ने विरोध दर्शविला आहे. हा निर्णय म्हणजे निवडणूक आयोगाचा पक्षपाती असून सत्ताधार्यांचा हातचे बाहुले झाली असल्याची टीका या पक्षांकडून करण्यात आली आहे.
प्रभाग रचना करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी प्रारुप प्रभाग रचना करून त्याचा मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करायचा होता. (Latest Pune News)
शासनाच्या सुधारित आदेशानुसार, आता आयुक्तांनी प्रभाग रचनेचा मसुदा थेट नगरविकास विभागाला सादर करायचा असून, त्यानंतर तो राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत राज्य शासनाचा हस्तक्षेप होणार आहे. त्यावर राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली आहे.
निवडणूक आयोग होतेय सत्ताधार्यांचे बाहुले
‘आप’चे नेते विजय कुंभार यांनी या निर्णयावर टीका करताना सरकारचा हस्तक्षेप वाढल्याने निवडणुका तरी कशाला घेता, असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रभाग रचना ही थेट मंत्रालयातून हुकुमशाही पद्धतीने ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग हे बाहुले झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यातील भाजपच्या आमदारांनी त्यांच्या पक्षाला सोयीची प्रभाग रचना केली असून, ती त्यांच्या पक्षाला फायद्याची ठरणार आहे, तीच राज्य शासनाकडे सादर होणार आहे. मात्र, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ज्या ठिकाणी नियमांचा भंग झाला असेल, त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
-प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)