

पुणे : ‘वंदे मातरम्’ या गीतास उद्या शुक्रवारी (दि.7 नोव्हेंबर) दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये तसेच प्रत्येक तालुक्यात ‘वंदे मातरम्’ या गीताचे समूहगान होणार आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे विद्यार्थी विकास मंडळाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या संचालिका डॉ. सविता कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.(Latest Pune News)
विद्यापीठातील विभागप्रमुख तसेच संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना डॉ. कुलकर्णी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, 7 नोव्हेंबरला ‘वंदे मातरम्’ या गीतास 150 वर्षे पूर्ण होत आहेत. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ‘वंदे मातरम्’ या गीताचे सामूहिक गान होणार आहे.
राज्यपालांचे अवर सचिव यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना संबंधित कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यापीठस्तरावरील सर्व विभागातील तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकवृंद, इतर सर्व कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सामूहिक गानप्रसंगी विद्यापीठ व त्या-त्या महाविद्यालयाच्या ठिकाणी अनिवार्यपणे उपस्थित राहण्यासाठी महाविद्यालयातील सर्वांना विद्यापीठामार्फत निर्देश देण्यासंदर्भात सूचित केले आहे. त्यानुसार महाविद्यालय मान्यताप्राप्त परिसंस्था, विभागामधील प्राध्यापकवृंद, इतर सर्व कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सामूहिक गान प्रसंगी अनिवार्यपणे उपस्थित राहणे गरजेचे आहे.
महाविद्यालय, परिसंस्था, विभागातील मुख्य सूचनाफलकांवर तसेच जिथे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येत असतात (उदा. : ग्रंथालय वाचन कक्ष/वर्गखोल्या/विश्रांतिगृह उपाहारगृह वसतिगृह) अशा दर्शनी भागात प्रदर्शित करून सर्व विद्यार्थ्यांना व इतर सर्व सदस्यांच्या निदर्शनास ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सामूहिक गान प्रसंगी अनिवार्यपणे उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे. संबंधित उपक्रम विद्यार्थी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, संबंधित शैक्षणिक विभाग यांसह आपले महाविद्यालय, परिसंस्थातील उर्वरित शैक्षणिक तथा सहशैक्षणिक विभाग, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सामूहिक सहभागातून यशस्वी करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, तसेच त्याचा अहवाल विद्यापीठास पाठवावा, असे देखील डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.