

वंदना चव्हाण
फौजदारी वकील, माजी नगरसेविका, महापौर, आमदार, राज्यसभेच्या माजी खासदार, शहरी गरिबी निर्मूलनाचे काम करणाऱ्या स्फूर्ती फाउंडेशनच्या संस्थापक आणि ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर शहरातील शंभराहून अधिक शाळांमध्ये ‘पुणे क्लायमेट वॉरिअर्स’ हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या खऱ्या वॉरिअर अशी वंदना चव्हाण यांची ओळख. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होण्याची चालून आलेली संधी सोडून त्या वडिलांची सूचना आणि अंकुश काकडे यांच्या आग््राहाखातर नगरसेवकाच्या मुलाखतीस तयार झाल्या. फक्त पाच वर्षेच काम करणार, या अटीवर राजकारणात पदार्पण करणाऱ्या वंदनाताईंना नंतर आजतागायत या जबाबदारीतून मुक्त होता आले नाही. नगरसेवकपदाच्या पहिल्या निवडणुकीची रंजक कहानी त्यांच्याच शब्दांत...
पण राजकारणात जावे, असे कधी ध्यानीमनीही नव्हते. हचिंग्ज शाळेत शिकत असताना वर्गाची मॉनिटर व नंतर हेड गर्ल म्हणून काम केले होते, एवढाच काय तो लिडरशिपचा अनुभव. राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी राजकारणात महिलांसाठी 30 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर 1992 मध्ये लोकमान्यनगर परिसरातील आमचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला. आमच्या भागातील नगरसेवक अंकुश काकडे हे वडिलांचे (ॲड. विजयराव मोहिते) विद्यार्थी असल्याने ते घरी येत असत.
वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यानंतर एक दिवस अंकुश काकडे आले आणि थेट मला म्हणाले, ‘वंदना, नगरसेवकपदासाठी तू उभी राहा.’ दोन-तीनवेळा सांगूनही मी दाद देत नाही, असे पाहिल्यावर ते माझ्या आईला भेटले. तिच्याशी बोलताना ते म्हणाले, ‘तुम्ही वंदनाला तयार करा, कदाचित ती पुण्याची महापौरही होऊ शकेल.’ पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आली तेव्हा एक कार्यकर्ता अर्ज घेऊन घाईघाईत आमच्या ऑफीसमध्ये आला. त्या वेळी मी एका केससाठी उलटतपासणी घेण्याची तयारी करीत होते. त्याने घाईघाईत अर्जावर सही करण्याची विनंती केली. ‘तीन वाजायच्या आत तो दाखल करायचा आहे,’ असेही सांगितले. मग मात्र मला चांगलेच दडपण आले. मी तातडीने वडिलांना व पतीला (हेमंत) बोलावून घेतले. या वेळी झालेल्या चर्चेच्या वेळी वडील म्हणाले, ‘एकीकडे आपण सिस्टिमला नावे ठेवतो आणि काम करायची वेळ आली की मागे सरकतो, हे योग्य नाही. तुला विचारणा होत आहे, तर तू ते स्वीकारावे, असे मला वाटते.’ त्यावर, ‘तुम्ही म्हणताय म्हणून मी फक्त पाच वर्षांकरिता हे स्वीकारते.’ या अटीवर मी त्या अर्जावर सही करण्यास तयार झाले.
माझी आई आणि सासूबाईंनाही मी या भानगडीत पडू नये, असे वाटत होते. त्याचे कारणही तसेच होते. एकतर माझ्या वकिलीची प्रॅक्टीस उत्तम चालू होती आणि मला उच्च न्यायालयाकडून न्यायमूर्तिपदाच्या मुलाखतीसाठी बोलावणेही आले होते. ज्या दिवशी काँग््रेास हाऊसमध्ये उमेदवारी निश्चित करण्यासाठी माझा इंटरव्ह्यू होता, त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही न्यायमूर्तिपदी निवड करण्यासाठी मला मुलाखतीला बोलावले होते. त्यामुळे मी मोठ्या द्विधा मनःस्थितीत होते. परंतु, वडिलांची इच्छा, पती हेमंत यांचा पाठिंबा आणि अंकुश काकडे यांच्या आग््राहाखातर मी राजकारणाचा मार्ग निवडला. या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन अंकुश काकडे यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बोलावून घेतले आणि प्रचाराला सुरुवात झाली. लोकमान्यनगरच्या 54 इमारतीत राहणाऱ्या मतदारांच्या
गाठीभेटी सुरू झाल्या. चार-चार मजले चढून माझी चांगलीच दमछाक होत होती, त्या वेळी मी चार महिन्यांची गरोदर होते. माझ्या गरोदरपणाबाबत समजल्यानंतर कार्यकर्तेच मतदारांना इमारतीखाली बोलावून घेऊ लागले. काँग््रेास नेते श्याम मानकर यांना मात्र पक्षाने मला दिलेली उमेदवारी मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी माझ्याविरुद्ध गीता परदेशी यांना रिंगणात उतरविले. त्यांनी तिचा प्रचारही केला. परंतु, अंकुश काकडे, त्यांचे कुटुंबीय व पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे चांगल्या मताधिक्याने मी विजयी झाले.
महापालिकेत नगरसेविक म्हणून काम करीत असताना वर्ष-दीड वर्षात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार शशिकांत सुतार यांच्याविरुद्ध लढण्यास खरेतर अंकुश काकडे इच्छुक होते. परंतु, काँग््रेासश्रेष्ठींनी माझे नाव पुढे केले. त्यामुळे माझ्यापुढे धर्मसंकट उभे राहिले. ज्यांच्या आग््राहाखातर मी राजकारणात आले, त्यांना डावलून आमदारकीची निवडणूक लढणे मला योग्य वाटेना, म्हणून शरद पवार यांची भेट घेऊन माझ्याऐवजी शिवाजीनगरमधून आपण काकडेंनाच तिकीट दिले पाहिजे, अशी विनंती मी केली. पण, पक्षाचा आदेश आहे, तो पाळला पाहिजे, असे सांगून त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली. त्यामुळे नाइलाजानेच मी ही निवडणूक लढले. विविध ठिकाणांहून आलेल्या काँग््रेास कार्यकर्त्यांनी सुतार यांच्याविरोधात प्रचाराची मोठी राळ उडवून वातावरण चांगलेच तापविले. परंतु, तरीही आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत तब्बल 80 हजार मते मला मिळाली. या निवडणुकीत सर्वत्र काँग््रेासची चांगलीच पीछेहाट झाली होती, तरी शरद पवारांची भेट घेऊन मी त्यांची माफी मागितली व राजकारणातून बाहेर पडण्याचा मनोदय बोलून दाखविला. त्यावर ते म्हणाले, ‘ते जाऊ दे, ज्या 80 हजार लोकांनी तुझ्यावर विश्वास दाखविला, त्यांच्यासाठी तुला आता काम करावे लागेल.’ नगरसेवक झाले तरी महापालिकेच्या कामकाजाची मला माहिती नव्हती. राजकारणाचा तर साधा गंधही नव्हता. आमदार कोण, खासदार कोण, याबद्दल काहीही माहिती नव्हती. माहीत होते ते फक्त अंकुश काकडे. पण, ही परिस्थिती मी आव्हान म्हणून स्वीकारली आणि परिसराचा बारकाईने अभ्यास सुरू केला. लोकमान्यनगर, नवी पेठ, जवळपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरून तेथील प्रश्न मी समजून घेतले व ते सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यासाठी नवनवीन कल्पना राबविल्या. मैदानात जॉगिंग ट्रॅक उभारणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांत 24 तास पाणी व लाईट उपलब्ध करणे, असे काही उपक्रम त्यातूनच सुरू झाले.
दुसरी म्हणजे 1997 ची निवडणूक पहिल्या निवडणुकीपेक्षा कठीण होती. या निवडणुकीत श्याम मानकर यांनी शिवसेनेकडून स्वतःच्या पत्नीलाच उतरविले. पण, दुसऱ्या टर्ममध्ये निवडून आल्यानंतर मला महापौरपद देण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग््रेासचा जन्म झाला होता. महापालिकेत महापौर या सर्वोच्च पदावर काम केल्यानंतर पुन्हा नगरसेवकपदाची निवडणूक लढविणे मला योग्य वाटत नव्हते. त्यामुळे यापुढे नगरसेवकपदाची निवडणूक लढवणार नाही, असे मी जाहीर करून टाकले होते. परंतु, 2002 च्या निवडणुकीत वेगळीच आव्हाने निर्माण झाली. तीनचा प्रभाग झाला होता. या प्रभागातून श्याम मानकरही इच्छुक होते. पक्षाचे पॅनेल निवडून आणायचे असेल, तर त्यात वंदना हवीच, नाहीतर तीन जागा कमी होतील, असे त्यांनीच कलमाडींना सांगितले. त्यामुळे कलमाडी यांनी मला बोलावून घेतले. ते म्हणाले,‘तीन जागा निवडून आण आणि नंतर राजीनामा दे.’ कलमाडींच्या आदेशामुळे नाइलाजास्तव मला निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत श्याम मानकर व मी विजयी झालो व शंकर पवार दीडशे मतांनी पराभूत झाले. त्यानंतरही 2010 मध्ये पक्षाने मला आमदार व दोनवेळा खासदार केले.
वडिलांची स्वप्नपूर्ती : माझे वडील ॲड. विजयराव मोहिते हे प्रसिद्ध फौजदारी वकील तर होतेच; पण निष्ठावंत काँग््रेासवालेही होते. पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व पक्षाध्यक्षा प्रमिलाकाकी चव्हाण यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. या दोघांनीही त्यांनी राजकारणात यावे, असे वाटत होते. परंतु, काही कारणाने ते होऊ शकले नाही. मात्र, माझ्या राजकारणप्रवेशाने त्यांचे अपुरे राहिलेले ते स्वप्न मी पूर्ण करू शकले, याचे समाधान आहे.