वकीलवस्ती ग्रामस्थांचा गणेश मंदिर पाडण्यास विरोध

वकीलवस्ती ग्रामस्थांचा गणेश मंदिर पाडण्यास विरोध

बावडा : पुढारी वृत्तसेवा : वकीलवस्ती ग्रामस्थांनी संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी गावचे भूषण असलेले प्रसिद्ध गणेश मंदिर पाडण्यास विरोध केला आहे. दरम्यान, गणेश मंदिर पाडण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र विरोध केला जाईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.इंदापूर-अकलूजदरम्यान तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आलेले आहे. हे गणेश मंदिर पालखी मार्गामध्ये जात नाही, असे सांगण्यात येत होते; मात्र आता अचानकपणे पालखी मार्गाच्या अधिकार्‍यांनी गणेश मंदिर पाडण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.

हे गणेश मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून ते वाचविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी; मात्र गणेश मंदिर पाडण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या संबंधीचे निवेदन केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, बारामतीचे उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंढरपूर यांना पाठविण्यात आले आहे.

कालवा कट केल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित

वकीलवस्ती येथील शेटफळ कालवा क्र. 11 हा जानेवारी 2023 पासून पालखी मार्गासाठी कट करण्यात आला आहे. त्यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांनी कालवा त्वरित बांधणार असल्याचे सांगितले होते. परंतु वर्ष होऊन गेले अजूनही कालवा बांधण्याची कसलीही हालचाल दिसत नसून, तब्बल वर्षापासून शेतकर्‍यांना पाणी मिळालेले नाही. परिणामी, वकीलवस्ती गावातील शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला असून त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हा कालवा तातडीने बांधावा, असा ठराव ग्रामसभेने केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news