

Vaishnavi Hagawane Case Latest Update
खेड : जेसीबी खरेदी-विक्री फसवणूक प्रकरणात शशांक हगवणे, त्यांची आई लता हगवणे आणि शशांकचा मित्र प्रणय तुकाराम साठे, (वय २५, रा. कोथरूड, मूळ गाव बालगुडी, ता. मुळशी) यांना राजगुरुनगर न्यायालयात शुक्रवारी (दि.६) हजर करण्यात आले होते, त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. नाईकनवरे यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. खेड तालुक्यातील या प्रकरणात तीन वसुली एजंटसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि.७ ) सर्व आरोपींची एकत्रित सुनावणी होणार आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, हगवणे कुटुंबीयांवर ११ लाख ७० हजार रुपयांच्या जेसीबी खरेदी-विक्री व्यवहारात फसवणुकीचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, आरोपींनी जेसीबी भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगितले, परंतु तपासात हा खरेदी व्यवहार असल्याचे नोटरी दस्तऐवजाद्वारे उघड झाले आहे. फिर्यादीने दिलेले ११ लाख ७० हजार रुपये बँकेला मिळाले नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या वेळी सरकारी वकील ॲड. विशाल डोळस यांनी न्यायालयात सांगितले की, प्रणय साठेने बँकेच्या वसुली एजंटशी मध्यस्थी करून जेसीबी जप्त करण्यास मदत केली. शशांक हगवणेकडून चालक देवानंद कोळीमार्फत प्रणय साठेला ३० हजार रुपये गुगल पेद्वारे ट्रान्सफर करण्यात आले. जे त्याने पुढे कोठडीत असलेल्या आरोपी गणेश पोतले याला दिले. यामुळे प्रणय साठेची या फसवणुकीतील भूमिका स्पष्ट होते. तसेच, नोटरी करारातील अटी-शर्ती तपासण्यासाठी आणि मूळ दस्तऐवज हस्तगत करण्यासाठी आरोपींना आणखी कोठडी द्यावी.
आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करताना ॲड. स्वानंद गोविंदवार म्हणाले की, जेसीबी ही स्थलांतरित मालमत्ता असून, केवळ नोटरीवर आधारित व्यवहार पूर्ण झाला असे मानता येणार नाही. यासाठी मालकी हक्क बदलाच्या टी.टी. अर्जावरील सह्या आवश्यक आहेत. तसेच, जेसीबी १८ महिने वापरल्याने त्याचे भाडे ११ लाख ७० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बँकेचे कोणतेही नुकसान झाले नाही. फिर्यादीने खोटा आरोप केल्याचा दावाही त्यांनी केला.
प्रणय साठेच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, प्रणयचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. पैसे ट्रान्सफरची तारीख नमूद नसून, गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांनी पैसे हस्तांतरित झाल्याचा दावा आहे. बँकेच्या प्रतिनिधींनी आरसी बुक तपासून जेसीबी हगवणेंच्या ताब्यात दिल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालयाने विक्रीचा पुरावा म्हणून टी.टी. फॉर्मच्या आवश्यकतेवर जोर दिला आणि केवळ नोटरीवर व्यवहार सिद्ध होत नाही, असे हगवणेंच्या वकिलांचे म्हणणे ऐकले. मात्र, तपासासाठी मूळ दस्तऐवज आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी आवश्यक असल्याने शशांक हगवणे, लता हगवणे आणि प्रणय साठे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पुढील सुनावणी शनिवारी (दि.७) होणार आहे. सर्व सहा आरोपींची एकत्रित सुनावणी होणार असून, हगवणे कुटुंबावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. हगवणेंच्या दहशतीमुळे स्थानिक लोक तक्रारी देण्यासाठी पुढे येत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जेसीबी प्रकरणात असलेला तिसरा आरोपी प्रणय साठे याला शुक्रवारी (दि. ६) दुपारी २ वाजून ५४ मिनिटांनी अटक करण्यात आली. त्याच्यावर रिकव्हरी एजंटशी मध्यस्थी केल्याचा ठपका आहे.