

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तपास आता अधिक खोलवर जात असून, घटनास्थळावरील महत्त्वाचा घटक असलेला बेडरूममधील पंखा सध्या संशयाच्या भोवर्यात आहे. वैष्णवीने गळफास घेतल्याचा दावा असलेल्या या पंख्याची रचना, ताकद आणि स्थिरता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने, पोलिसांनी पंखा आणि साडी थेट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. (Pimpari chinchwad news)
16 मे रोजी मुळशी तालुक्यातील भुकूम येथील फ्लॅटमध्ये वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. प्राथमिक तपासानुसार तिने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, घटनास्थळाच्या पंचनाम्यात व शवविच्छेदन अहवालातून समोर आलेले पुरावे वेगळेच चित्र दर्शवत आहेत. तिच्या शरीरावर आढळलेल्या 29 जखमांपैकी 15 जखमा मृत्यूपूर्व 24 तासांत झालेल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एकीकडे वैष्णवीच्या आत्महत्येचे चित्र रेखाटले जात असतानाच, दुसरीकडे घटनास्थळी आढळलेला पंखा संशयास्पद ठरतो आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे वैष्णवीने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी जेव्हा पंख्याचे निरीक्षण केले, तेव्हा त्याच्या फिक्सिंग, फिटिंग अँगल, स्क्रूज आणि मेटलच्या मजबुतीविषयी शंका निर्माण झाली.
पोलिसांनी पंखा तातडीने खोलून फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला आहे. वैष्णवीचे वजन सुमारे 70 किलोच्या आसपास असल्याने, इतके वजन सहन करण्याची पंख्याची क्षमता होती का, याचे तांत्रिक विश्लेषण आता होणार आहे. फॉरेन्सिक अहवालात या पंख्याने किती दबाव झेलला, त्यावर साडीचा ताण पडला होता का, स्क्रू सैल झाले होते का, पंखा हललेला होता का, याचे तपशील येणार आहेत. या तपासातूनच आत्महत्या की घातपात, यावर निर्णायक भूमिका स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याचे वैवाहिक जीवन आधीच वादग्रस्त होते. दरम्यान, तो एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. निलेशने गुन्ह्यानंतर दिल्ली गाठताना या मैत्रिणीसह प्रवास केला होता. त्यामुळे आता तिच्यासह आणखी दोन महिलांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. या महिलांनी दिलेल्या जबाबात निलेशच्या स्वभावातील आक्रस्ताळेपणा, महिलांप्रती असलेला तुच्छभाव, वैष्णवीवर टाकलेला मानसिक तणाव आणि नात्यातील हस्तक्षेप याबाबत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
या प्रकरणात आतापर्यंत शशांक हगवणे, राजेंद्र हगवणे, लता हगवणे, सुशील हगवणे, करिष्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेले मोबाईल, फॅब्रिक नमुने, वैष्णवीच्या मानेवरील व डोक्यावरील जखमा, कॉल डिटेल्स आणि तिच्या मृत्यूपूर्व हालचाली यांचा तपास सुरू केला आहे. दरम्यान शशांक, लताचा ताबा महाळुंगे पोलिसांकडेही आहे.
राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे आणि नीलेश चव्हाण या तिघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते, जी मंगळवारी (दि. 3) रोजी संपत आहे. कोठडीच्या अखेरच्या दिवशी पोलिसांनी तिघांची आमनेसामने चौकशी केली. आता या तिघांना पुन्हा न्यायालयात सादर करण्यात येणार असून, तपास अधिक सखोल करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवण्याची विनंती बावधन पोलिस करणार आहेत.
चव्हाणच्या वापरात असलेल्या एका लॅपटॉपमध्ये काही व्हिडिओ क्लिप्स असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तो जप्त केला होता. मात्र, चौकशीदरम्यान नीलेशने संबंधित लॅपटॉप आपला नसल्याचे स्पष्ट केले. सदर लॅपटॉप सध्या न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर त्यातील माहितीचा तपशील उघड होणार आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शशांक हगवणे याने तक्रारदार प्रशांत येळवंडे यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरच धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माझ्यावर मामाचा वरदहस्त आहे, तू काही करू शकत नाहीस, असे म्हणत शशांकने दबाव टाकल्याचे येळवंडे यांनी सांगितले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अलीकडेच दाखल झालेल्या 11 लाख 70 हजार रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात, आरोपी शशांक आणि लता हगवणे यांच्यावर जेसीबी व्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी धमकीतील मामा हा उल्लेख पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचा असल्याचा दावा प्रशांत येळवंडे यांनी केला आहे.