

पुणे: कुराशचे प्रशिक्षण घेतलेल्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलीसमोर २३ वर्षांची 'खेळाडू' उभी राहिली. कागदोपत्री ती कुराशमध्ये पारंगत होती; मात्र, प्रत्यक्ष लढत सुरू होताच काही सेकंदांतच तिचा खेळ संपला. १२ वर्षांच्या मुलीने तिला सहज हरवले आणि वर्षानुवर्षे कुराशचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्रामागील बोगसगिरी उघडी पडली. या लढतीने पोलिसही अवाक झाले.
केवळ एकच नव्हे, तर अशाच प्रकारे इतर संशयित 'खेळाडूं'नाही प्रशिक्षित खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला. पुणे पोलिसांनी लढवलेली युक्ती ही तपासातील महत्त्वाची बाब ठरली. अन् या प्रक्रियेने कुराश बनावट प्रमाणपत्राचे पितळच पूर्णपणे उघडे पाडले. या प्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी जयवंत साळुंखे तसेच कोल्हापूर येथील धैर्यशील आणि श्रुती पुनगावकर या दाम्पत्यालाही अटक झाली आहे.
क्रीडा प्रमाणपत्रांच्या पडताळणीदरम्यान कागदपत्रांमध्ये संशयास्पद बाबी आढळल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाची अनोख्या पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. बालेवाडी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पडताळणीनंतर पोलिस मुख्यालयात कुराशचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलेल्या आठ ते दहा खेळाडूंना बोलावण्यात आले. त्यांच्यासमोर संशयित खेळाडूंच्या प्रत्यक्ष लढती घेण्यात आल्या. कागदावर 'विजेते' असलेल्या काही खेळाडूंचे प्रत्यक्ष मैदानातील कौशल्य पाहताच त्यांच्या प्रमाणपत्रांमागील संशय अधिक गडद झाला.
या प्रत्यक्ष चाचणीत काही खेळाडूंना कुराशच्या प्राथमिक डावपेचांचीही माहिती नसल्याचे समोर आले. ज्या खेळाडूंनी राज्य, जिल्हा अथवा अन्य स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते, त्यांना प्रत्यक्ष लढतीत साध्या हालचालीही करता येत नसल्याचे आढळले. त्यामुळे कागदावरील 'चॅम्पियन' आणि प्रत्यक्ष मैदानातील कामगिरी यातील मोठी तफावत पोलिसांच्या निदर्शनास आली. खरे प्रशिक्षण घेणारे खेळाडू वर्षानुवर्षे सराव, मेहनत आणि स्पर्धांमधून स्वतःला घडवत असताना केवळ पैशांच्या जोरावर प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरीच्या रांगेत पुढे जाण्याचा हा प्रकार पुणे पोलिसांनी उघड केला. गुन्ह्याचा तपास अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त गोहर हसन यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
हे आले तपासात समोर...
क्रीडा विभागाच्या माहितीतून बोगसगिरी उघड
मैदान नसतानाही स्पर्धा दाखवली
संघटनेच्या नावावर कागदोपत्री स्पर्धा
२०१८ च्या प्रमाणपत्रावर 'संभाजीनगर'; त्यावेळी नाव 'औरंगाबाद'
दोन समान नावांच्या असोसिएशनची कागदपत्रे
एका संघटनेच्या प्रमाणपत्रावर दुसऱ्याच्या अध्यक्षाची स्वाक्षरी
वय, वजन व स्पर्धेच्या तपशिलात आढळली तफावत
नोकरी, सवलतींसाठी बोगस प्रमाणपत्रांचा वापर
मध्यस्थांमार्फत लाखो रुपयांची वसुली
बनावटगिरीमुळे खऱ्या खेळाडूंच्या हक्कावर गदा