

बारामती: वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालविण्यापेक्षा वीजग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या 1912, 18002333435 व 18002123435 या तीनपैकी एका टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा व वीज बिलासंबंधीच्या तक्रारीं नोंदवाव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणची यंत्रणा टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी 24 तास कार्यरत आहे, असे बारामती परिमंडलाने सांगितले आहे. राज्यातील वीज ग्राहकांची संख्या तीन कोटींच्या घरात, तर बारामती परिमंडलाची 30 लाखांत आहे. (Latest Pune News)
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणासह मिळाली, तर ती वेळेत प्रश्न निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते. मात्र, सद्य:स्थितीत ग्राहक ऑनलाइनपेक्षा वैयक्तिक तक्रारींवर जादा भर देत असल्याने यंत्रणेचा वेळ वाया जातो.
फोनवर केलेल्या तक्रारींची नोंद नसते
टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारींची नोंद ऑनलाइन प्रणालीत होते. त्याउलट एखाद्या वीज कर्मचार्याला फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद होत नाही. कारण ज्यावेळी एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित होतो, तेव्हा एकाच वेळी त्याला अनेक फोन येतात. प्रत्येक जण त्याचे नाव, पत्ता सांगण्यात वेळ घालवतो. तसेच, फोन चालू असल्यामुळे त्याला फॉल्ट शोधता येत नाही. खांबावर किंवा वीजवाहिनीवर काम करताना घेतलेला कॉल त्याचा जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे वैयक्तिक फोन करणे टाळावे.
एसएमएस व मिस कॉलद्वारे तक्रार
वीज ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा किंवा नोंदणीकृत मोबाईलवरून ""NOPOWER'' हा संदेश टाइप करून 9930399303 या क्रमांकावर पाठवल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते व तसा संदेश ग्राहकाला मिळतो.
संकेतस्थळ, मोबाईल अॅपचा वापर
महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा ऑनलाइन झालेल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे अॅप प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरहून डाऊनलोड करावे. यामध्ये एकापेक्षा जास्त वीज जोडण्या एकदाच नोंदणी करून हाताळता येतात. याशिवाय महावितरणच्या संकेतस्थळावरही ग्राहक सेवा स्वतंत्रपणे दिल्या आहेत. ग्राहकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येतो.
तक्रार कोठे करावी?
महावितरणची सेवा केंद्रे शेकडो कर्मचार्यांसह 24 तास कार्यरत आहेत. त्यासाठी ग्राहकांनी वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रार तत्काळ नोंदविण्याकरिता 1912, 18002333435 व 18002123435 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
हे क्रमांक संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. तक्रार नोंदविताना ग्राहकांनी त्यांचा 12 अंकी ग्राहक क्रमांक नोंदविल्यास महावितरणला त्या ग्राहकाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. ती तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. तसेर्चें तक्रारीची नोंद ऑनलाइन प्रणालीत झाल्यामुळे वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानकांनुसार वेळेत सोडवणे बंधनकारक बनते.