नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी सरपंच रोहिदास वेठेकर यांनी माजी आमदार अतुल बेनके यांच्या पराभवाची कारणेच थेट मंचावर उघड केली. ’अतुल बेनके यांनी शरद पवारांची साथ सोडली, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे ऐकले नाही, फक्त तरुणांचे ऐकले आणि म्हणून त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला,’ असे वेठेकर यांनी सांगितले. बेनके व वेठेकर यांचा अनेक वर्षांचा घरोबा आहे, हेदेखील सांगायला ते विसरले नाहीत.
या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे आणि स्वत: अतुल बेनके एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना वेठेकरांनी कोणतीही भीडभाड न ठेवता बेनकेंच्या तोंडावरच सत्य बोलून दाखविले. हे ऐकून व्यासपीठावरील कोल्हे आणि सोनवणेंनी टाळी वाजवली आणि बेनकेंसमोरच हलकेसे हास्यसुद्धा फुलविले. (Latest Pune News)
दरम्यान, सध्या खासदार अमोल कोल्हे व माजी आमदार अतुल बेनके यांची जवळीक वाढली आहे. त्याचबरोबर ’विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर व खासदार कोल्हे यांच्यात दुरावा दिसू लागला आहे.
या कार्यक्रमात हे दोघे एकत्र येऊ शकत होते. कोल्हे, सोनवणे, बेनके व शेरकर हे या कार्यक्रमाला एकत्र येणार, अशा प्रकारचे फ्लेक्स गावात लावण्यात आले होते. परंतु, सत्यशील शेरकर यांनी या कार्यक्रमाला सकाळीच हजेरी लावून दुसर्या कार्यक्रमाचे निमित्त पुढे करून ते निघून गेले. त्यामुळे आज देखील सत्यशील शेरकर यांनी खासदार कोल्हे यांना चकवा दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.