पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2025 मध्ये होणार्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता यूपीएससीच्या परीक्षांची तयारी करणार्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यूपीएससीने परीक्षा दिनदर्शिकेद्वारे नागरी सेवा परीक्षा, एनडीए, सीडीए, वनसेवा, भूशास्त्र अशा विविध परीक्षांच्या तारखा, परीक्षांची नोंदणी, याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नागरी सेवा परीक्षा 2025, भारतीय वनसेवा परीक्षा 2025 म्हणजेच यूपीएससी पूर्वपरीक्षा 2025 ची एकत्रित नोंदणी करता येईल. ही परीक्षा 25 मे रोजी होणार आहे. नागरी सेवा पूर्वपरीक्षेतील यशस्वी उमेदवारांसाठी 22 ऑगस्टपासून नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (एनडीए-एनए) परीक्षा 2025 आणि समाईक संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षा 2025 साठीची नोंदणी 11 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान करता येणार आहे.
त्यानंतर नोंदणीकृत उमेदवारांची परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी होणार्या अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2025 साठीची नोंदणी प्रक्रिया 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. 9 फेब्रुवारीला संयुक्त भू-वैज्ञानिक पूर्वपरीक्षा 2025 होणार आहे. त्यासाठी 4 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2024 या कालावधीत नोंदणी करता येणार आहे.
हेही वाचा