पुणे : पीएमपीच्या बसगाड्यांमध्ये पुढील आठवड्यापासून गुगल पे, फोन पे, पेटीएम म्हणजेच यूपीआय तिकीट (क्युआर कोड) प्रणाली सुरू होणार आहे. त्यामुळे आता प्रवासी आणि वाहकामध्ये सुट्या पैशावरून होणारे वाद थांबणार आहेत. तिकिटाचे पैसे थेट पीएमपीच्या खात्यात जमा होणार असून, तिकीटवाटपातील भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे. 'भाजीवाल्याकडे यूपीआय, पीएमपीत का नाही' अशा शीर्षकाखाली नुकतेच दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते, त्याची दखल घेत पीएमपी प्रशासनाने पुढच्या आठवड्यापासून म्हणजेच सोमवार किंवा मंगळवारपासून बस गाड्यांमध्ये यूपीआय (क्युआर कोड) तिकीट प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्वी पीएमपीमध्ये कॅश तिकीट सिस्टीम असल्यामुळे पीएमपीचे वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्या पैशांवरून प्रचंड वाद होत होते. तर काही चालक तिकिटाचे सुट्टे पैसे प्रवाशांना परत देत नसल्याच्या तक्रारी होत्या. तसेच अनेकविध मार्गांनी तिकीट विक्री करताना भ्रष्टाचार होत असल्याचेही समोर आले होते. दै. 'पुढारी'ने याबाबत वृत्त प्रसिध्द करून पीएमपीएमएलचे नवे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. याची तत्काळ दखल घेत सिंह यांनी क्युआर कोड यंत्रणा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केली आहे.
पीएमपी अध्यक्षांनी पीएमपीएमएलचे उत्पन्नात वाढ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्याकरिता त्यांच्याकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीमध्ये पास सुविधा सुरू केली आहे. त्यासोबतचे पुणे, पिंपरी, पीएमआरडीए हद्दीमध्ये एकत्रित सवलतीच्या दरात प्रवाशांना प्रवास करता यावा, याकरिता 120 रुपयांचा सवलतीच्या दरात दैनिक पास उपलब्ध केला आहे. प्रवाशांकरिता मासिक पास उपलब्ध करून दिला आहे.
पीएमपीएमएलमध्ये यूपीआय (क्युआर कोड) प्रणाली पुढच्या आठवड्यात म्हणजेच येत्या सोमवारी किंवा मंगळवारपासून सुरू करण्यात येत आहे. त्या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रणालीचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल.
– सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष, पीएमपीएमएल
हेही वाचा