Pune University : अधिसभेमध्ये विद्यापीठ कर्मचार्‍यांचा राडा

Pune University : अधिसभेमध्ये विद्यापीठ कर्मचार्‍यांचा राडा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा सलग दुसर्‍या दिवशी वादळी ठरली. विद्यापीठाच्या एका अधिसभा सदस्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर व कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीवर कडक शब्दांत टीका केली. त्यावर उत्तर देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना गहिवरून आले. ही बाब कर्मचारी व अधिकारी यांना समजताच त्यांनी मोर्चा काढत विद्यापीठाच्या अधिसभेत घुसून गोंधळ घातला, त्यामुळे काही काळ विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या :

अधिसभेच्या दुसर्‍या दिवशी अधिसभा सदस्य विविध प्रस्ताव मांडत होते. त्या वेळी विद्यापीठात विविध कामांसाठी आल्यानंतर विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांकडून प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांना, एवढेच नाही तर अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्यांनाही अपमानास्पद वागणूक दिली जाते. विद्यापीठात आल्यानंतर त्यांची कामे होत नाहीत. त्यांना तासन् तास विद्यापीठात बसवून ठेवले जाते. त्यांचा वाईट पद्धतीने अपमान केला जातो. त्यामुळे अशा कामात हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव एका सदस्याने अधिसभेत ठेवला. त्यावर बराच वेळा चर्चा झाली. मात्र, या घटनेला वेगळेच वळण मिळाले.

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार अधिसभा सदस्यांना उत्तर देताना म्हणाले, 'विद्यापीठ प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. हा विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. अधिसभा सदस्यांना कटू अनुभव आले होते. त्यांची या प्रकरणी लेखी स्वरूपातील तक्रार घेण्यात आली. तसेच संबंधित कर्मचार्‍यांच्या विरोधातील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र,विद्यापीठात अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे अत्यंत कमी मनुष्यबळावर विद्यापीठाला काम करावे लागते, असे असताना तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्ती विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत, असे वक्तव्य करता यामुळे मी व्यथित झालो आहे. विद्यापीठातील कर्मचारी अनेक महिने सुट्टी न घेता काम करतात,' असे म्हणत डॉ. प्रफुल्ल पवार गहिवरून आले व त्यांचे डोळे पाणावले. त्यावर सभागृह काही कालावधीसाठी स्तब्ध झाले. विद्यापीठातील अधिकारी व इतर सदस्यांनी संबंधित प्रस्ताव माग घेण्यास सांगितले. तसेच संबंधित अधिसभा सदस्यांनीसुद्धा दिलगिरी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या अधिसभेत घडलेला हा प्रकार विद्यापीठ परिसरात वार्‍यासारखा पसरला. त्यावर विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत संबंधित अधिसभा सदस्याविरोधात घोषणा दिल्या. 'तुम्ही पाच वर्षांसाठी विद्यापीठात निवडून येता, तर आम्ही 30 ते 35 वर्षे विद्यापीठासाठी काम करतो. आम्हाला शिकवू नका, कुलसचिव हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. ते व्यथित झाले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आरोप करणार्‍या अधिसभा सदस्याला निलंबित करा. त्यांचे पद रद्द करा,' अशी मागणी करता 'कामगार एकजुटीचा विजय असो…' अशा घोषणा देत सुरू असलेल्या अधिसभेत प्रवेश केला. कुलसचिव व इतर सदस्यांनी मध्यस्थी करून कर्मचार्‍यांना बाहेर काढले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले.

ठराव संकेतस्थळावर टाकणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतले जाणारे निर्णय नेहमीच गुलदस्तात ठेवले जातात. त्याबाबत अधिसभा सदस्यांना कोणती माहिती दिली जात नाही. यावर सदस्यांनी रविवारी सभागृहात तीव— नाराजी व्यक्त केली. तसेच व्यवस्थापन परिषदेचे सर्व निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावेत, अशी मागणी केली. या मागणीस विद्यापीठ प्रशासनातर्फे मान्यता दिली जात असल्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी जाहीर केले. परिणामी, विद्यापीठाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येणार आहे.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेच्या दुसर्‍या दिवसाचे कामकाज रविवारी पार पडले.

अधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत केल्या जाणार्‍या कामकाजात पारदर्शकता असावी, यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सर्व निर्णय वेबसाइटवर टाकावेत, अशी मागणी केली. सुरुवातीला व्यवस्थापन परिषदेत यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले. त्यावर अधिसभा सदस्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीपासून पुढील सर्व बैठकांमध्ये घेतल्या जाणार्‍या निर्णयाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news