पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांचे शैक्षणिक वर्ष 2024-25 जाहीर करण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार 1 जुलैपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असून, पुढील वर्षी 19 मे रोजी शैक्षणिक वर्षाची सांगता होणार आहे. यात विद्यापीठाने हिवाळी आणि उन्हाळी सुट्यांचा कालावधीही जाहीर केला आहे.
विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यता, वाणिज्य आणि व्यवस्थापन, आंतरविद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांतर्गत असलेल्या विभागातील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठाचे पहिले सत्र 1 जुलै ते 14 डिसेंबरदरम्यान तर दुसरे सत्र 1 जानेवारी ते 19 मे या कालावधीत होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिली आहे.
विद्यापीठातर्फे पदवी प्रवेशासाठी दि. 13 जून रोजी, तर पदव्युत्तरसाठी दि. 14 ते दि. 16 जून यादरम्यान ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर तातडीने विविध विभागांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. यंदा पहिल्यांदाच विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. त्यादृष्टीने शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर करून विद्यापीठ प्रशासनाने पहिले पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिले सत्र : 1 जुलै 2024 ते 14 डिसेंबर 2024
दुसरे सत्र : 1 जानेवारी 2025 ते 19 मे 2025
हिवाळी सुटी : 16 ते 31 डिसेंबर 2024
उन्हाळी सुटी : 21 मे ते 30 जून 2025
हेही वाचा