

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वलवन, लोणावळा व लोणावळा सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा महाविद्यालयाच्या प्रांगणात संकल्प नशामुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात हेमकुमार आझाद व लोणावळा सायकलिंग क्लबचे भरत भरणे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा. राहुल सलवदे व प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले. पुस्तके देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी आझाद यांनी भारत नशामुक्ती करण्याच्या ध्येयाने मे महिन्यापासून छत्तीसगडवरून सायकलवारी करत, सुमारे 8 राज्यांचा प्रवास करून महाराष्ट्रात आलो आहे असे सांगितले. आझाद यांनी मानसिक ताणतणाव, नशा करण्याची कारणे सांगत युवावर्ग नशेची शिकार होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. नशेमुळे भावना, एकाग्रता, आरोग्यावरील दुष्परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. तसेच भारत नशामुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली.
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर यांनी त्यांना पुढील प्रवासासाठी आणि संकल्पासाठी शुभेच्छा दिल्या. प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दीपक तारे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संजय साळुंके यांनी व आभार प्रा. धनराज पाटील यांनी केले. या वेळी अनिल विश्वासराव, डॉ. राजेंद्र देवरे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा