.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Political News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा भौतिक, आर्थिक विकास होतो आहे. केंद्राच्या विचाराचे सरकार राज्यात आले, तर राज्याचा विकास गतीने होतो. त्यानुसार मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गतिमान झाला असून, विकासाचा वेग वाढलेला आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या प्रचारार्थ मंगळवारी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा झाली. या सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचे व्हिजन असलेले नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्याचा सर्वांगीण सुरू केला आहे.
मोदींनी दुसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये वाढवण बंदर विकसनासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले. राज्य शासनाने लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, युवकांना रोजगार अशा अनेक योजना राबवल्या आहेत. आम्ही ज्या योजना दिल्या त्या योजना लोकप्रिय झाल्या आहेत.
या योजना जाहीर झाल्यानंतर तिजोरी मोकळी केली, अशी टीका विरोधकांनी केली. मात्र, त्यांनी जाहीर केलेल्या पंचसूत्रीसाठी यापेक्षा जास्त निधी लागणार आहे. लोकांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत आहेत. आम्ही सुरू केलेल्या योजना पुढे चालण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे पुण्यावर प्रेम आहे. आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांमध्ये मोदींनी पुण्याला सर्वाधिक भेटी दिल्या आहेत. जगाच्या पटलावर भारताला महासत्ता म्हणून ओळख निर्माण करून देण्यात मोदींना यश आले आहे.
जगातील नव्वद देशांना भारत युद्धाची यंत्रसामुग्री निर्यात करतो, हीच विकसित भारताची ओळख आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तर सहकार मजबूत आणि समृद्ध करणे गरजेचे आहे, हे ओळखून मोदींनी स्वतंत्र सहकार खाते सुरू केले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेला राज्याच्या विकासाचा रथ महाविकास आघाडीच्या काळात रोखला गेला. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर हा रथ पुन्हा वेगाने धावत आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, संविधान बदलणार, असा खोटा प्रचार करून लोकसभेला महाविकास आघाडीने यश मिळवले. कोणाचा बापही संविधान बदलू शकत नाही. अजित पवारांनी देशाच्या व राज्याच्या हिताचा निर्णय घेतला.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे सर्व जाती, धर्मांचा विकास झाला. चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे व सातारा हे जिल्हे राज्याची सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.