

PM Modi News: काश्मीरमध्ये राज्यघटनेचे रद्द झालेले 370 कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी काश्मीर विधानसभेत संमत केला आहे. मी आपल्याला विचारतो की, काश्मीरमध्ये पुन्हा 370 लागू करा, ही कोणाची मागणी आहे? ही भाषा केवळ पाकिस्तानची होती. आज ती भाषा काँग्रेस बोलत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली.
कर्नाटकात काँग्रेस जनतेला खुलेआम लुटते आहे. तो लुटीचा पैसा महाराष्ट्रात पाठवून निवडणूक लढवली जात आहे. महाराष्ट्राला वाचवायचे असेल, तर काँग्रेस नावाची आपत्ती दूर ठेवा, असे आवाहन करत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकारचा नारा दिला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरातील स. प. महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी संबोधित केले.
या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले, खा. श्रीरंग बारणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील (कोथरूड), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), चेतन तुपे (हडपसर), विजय शिवतारे (पुरंदर), राहुल कुल (दौंड), सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर), हेमंत रासने (कसबा), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), माधुरी मिसाळ (पर्वती), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोन्मेंट), महेश लांडगे (चिंचवड), शंकर मांडेकर (भोर-वेल्हा-मुळशी), भीमराव तापकीर (खडकवासला), शंकर जगताप (चिंचवड), अण्णा बनसोडे (पिंपरी) आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार...
ते पुढे म्हणाले, मी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात फिरत आहे. अशीच गर्दी, असाच उत्साह, हाच उमंग मला सर्वत्र दिसत आहे. पुणे शहराच्या रस्त्यावर मला हेच चित्र दिसले. त्यांचा नमस्कार घेत येताना मला उशीर झाला. रस्त्यावर इतकी गर्दी होती, की मी सर्वांचे समाधान करू शकलो नाही. ही गर्दी, हा उत्साह हेच सांगतो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार.
वीर सावरकर अन् बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा?
शेवटी मोदी म्हणाले, मी आव्हान देतो या काँग्रेस अन् महाविकास आघाडीला की, वीर सावरकरांची जरा स्तुती करून दाखवा, त्या काँग्रेसच्या युवराजाला माझे आव्हान आहे की, वीर सावरकर आणि बाळासाहेबांची स्तुती करून दाखवावी. काँग्रेसला नीती, नियत आणि नैतिकता नाही. काँग्रेस केवळ सत्तेसाठी दिशाभूल करत आली आहे.
आईचे चित्र पाहताच झाले भावुक...
सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी मोदींचे व्यासपीठावर आगमन झाले. 7 वाजून 12 मिनिटांनी ते बोलायला उभे राहताच गर्दीतून त्यांना लहान मुलांच्या हातात एक सुंदर चित्र झळकताना दिसले. ते त्यांच्या आईचे होते. आई हिराबेन यांचे हातात वीणा घेतलेले चित्र पाहून मोदी भावुक झाले. ते म्हणाले, ही चित्रे माझ्याकडे पाठवा. त्यामागे तुमचे नाव, पूर्ण पत्ता लिहा. मी तुम्हाला धन्यवादाचे पत्र पाठवेन, असे म्हणत त्यांनी चित्र झळकविणार्या लहान मुलांचे कौतुक केले.
जातीपातीत काँग्रेसच भांडणे लावत आहे...
मोदी म्हणाले, काँग्रेचा डाव वेगळा आहे. ते दलित, आदिवासी आणि देशातील एससी, एसटी, ओबीसीमध्ये भांडणे लावून त्यांना वेगळे क?ण्याच्या विचारात आहेत. त्यांना कमजोर करून मग आरक्षण काढून घेण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शेवटी ’हम सब एक रहेंगे, तो सेफ रहेंगे’ हा नारा देत त्यांनी सुमारे 36 मिनिटांच्या भाषणाला विराम दिला. 20 नोव्हेंबर रोजी महायुतीला मतदान करा. एक एक मत तुमच्या विकासाची गॅरंटी देईल, असे आवाहन करीत त्यांनी प्रसन्न मुद्रेने पुणेकरांना हात जोडून अभिवादन केले.