

पुणे : शहरातील ओव्हर हेड केबलवर कारवाई करताना आमदार- खासदारांसह नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबलही प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. या केबल काढल्यानंतर आता अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही बंद पडल्यानंतर ते सुरू करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांत महापालिकेकडून शहरात तब्बल 3500 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रामुख्याने नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. प्रामुख्याने क्षेत्रीय कार्यालयांकडून ही कामे केली आहेत. त्यामुळे त्याच्या नोंदी एकाच ठिकाणी नाहीत. यामधील काही ठिकाणची यंत्रणा थेट संबंधित पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिल्या आहेत. महापालिकेकडून आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत ओव्हरहेड केबलवर कारवाई सुरू केली आहे. त्यात अनेक ठिकाणी कारवाईनंतर महापालिकेचे सीसीटीव्ही बंद पडल्याचे निदर्शनास आले आहे.
ठेकेदारांनी सीसीटीव्ही बसवताना त्यांच्या केबल अनधिकृतपणे उघड्यावर टाकल्याने पालिकेच्या कारवाईचा फटका त्यांना बसला आहे. दुसरीकडे शहरात डीप क्लीन ड्राइव्ह मोहीम सुरू असून, या मोहिमेत मोठया प्रमाणात ओव्हरहेड केबल कापल्या जात आहेत. मात्र, हे केबलचे जाळे काढण्याच्या नादात महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्हीची कनेक्शनच कट केली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे फुटेजच दिसत नाही. अशा बंद असलेल्या सीसीटीव्हींबाबत पोलिसांकडून महापालिकेस पत्रही दिली आहेत. मात्र, महापालिकेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
ओव्हरहेड केबल काढल्यामुळे आता नेमके कोणते सीसीटीव्ही बंद आहेत, याची तपासणी महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. माननीयांच्या हट्टापायी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीची केबल अनधिकृतपणे टाकल्यामुळे पालिकेचा कोट्यवधीचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने बसविलेल्या सीसीटीव्हीमधील सुमारे 1500 सीसीटीव्ही सुरू असून, उर्वरित सीसीटीव्ही बंद आहेत.