

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या ताब्यातील 58 तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील तीन असे एकूण 61 पूल जिल्ह्यात धोकादायक आहेत. ते पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले असले तरी त्याची प्रत्यक्ष कारवाई पावसाळ्यानंतरच होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या तीन पुलांपैकी एका पुलाला पर्यायी पूल यापूर्वी बांधून झाला आहे. त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे, तर दोन पुलांना पर्याय म्हणून नवे पूल बांधण्यात येत आहेत. त्यातील एक पूल महिनाअखेर, तर दुसरा पूल 2026 मध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरत बाविस्कर यांनी दिली.
मावळ तालुक्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डुडी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पूल, साकव यांची तपासणी करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालात तीन पूल धोकादायक असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर डुडी यांनी हे तिन्ही पूल पाडण्याचे आदेश विभागाला दिले होते.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरत बाविस्कर म्हणाले, सार्वजनिक विभागाकडील तीन पूल धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे. त्यानंतर हे पूल पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यातील इंद्रायणी नदीवरील देहू गावाच्या हद्दीतील पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्याला पर्याय म्हणून बांधण्यात आलेला नवीन पूल वाहतुकीस यापूर्वीच खुला केला आहे. सध्या नदीपात्रात पाणी जास्त असल्याने हा पूल पाडण्यासाठी पावसाळ्यानंतर नियोजन केले आहे. दुसरा पूल मरकळमधील असून, या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविले आहे. मात्र, ही वाहतूक सुरूच आहे. या पुलाला पर्यायी पूल पुढील वर्षी मेमध्ये पूर्ण होणार आहे.