पुणे : जंगली प्राण्यांची प्रतिकार शक्ती सर्वाधिक असते. जंगलात राहताना वातावरणात बदल झाला तरी ते परिस्थितीशी जुळवून घेतात. त्यामुळे त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील चिंकारा हरणांची राहण्याची व्यवस्था ही जंगलातील वातावरणाप्रमाणे करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच समजेल, अशी माहिती महानगरपालिकचे माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे यांनी दैनिक ’पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात गेल्या आठ दिवसांत अज्ञात कारणामुळे 16 चिंकारा हरणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्राणिसंग्रहालय प्रशासन आणि पुणे महानगरपालिकाही चक्रावून गेली आहे. हरणांच्या मृत्यूमागे एखाद्या साथीच्या आजाराची शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या प्राणिसंग्रहालयात एकूण 98 चिंकारा हरणे आहेत.
उद्यानात वन्य प्राण्यांची व्यवस्था कशी राखली जाते, तसेच त्यांच्या प्रकृतीची काळजी कशी घेतली जाते, याची माहिती देताना यशवंत खैरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात हरणांचा मृत्यू झालेला नाही. प्राणिसंग्रहालयात प्राणी ठेवताना जंगलात जसे वातावरण आहे, तशा पद्धतीने त्यांची राहण्याची ठिकाणे तयार केली जातात. त्यांचा परिसर मोठा असतो. तसेच, हा परिसर खुला असतो. हरणासारख्या प्राण्याला रोज पकडून त्याची प्रकृती कशी आहे? हे तपासणे शक्य होत नाही.
प्राण्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचार्यांची नेमणूक केलेली असते. हे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. प्राण्यांच्या वागणुकीत त्यांना बदल आढळल्यास ते याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना देतात. यानंतर आजारी प्राण्यावर लक्ष ठेवले जाते व आवश्यक वाटल्यास उपचार केले जातात.
प्राणिसंग्रहालयात ज्या ठिकाणी प्राण्यांना ठेवले जाते, त्या ठिकाणी त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था देखील केली जाते. हरणांना प्रामुख्याने विशिष्ठ प्रकारचे गवत आणि भाज्या खायला दिल्या जातात. यापूर्वी त्या स्वच्छ आणि खाण्यायोग्य आहेत की नाही, याची देखील तपासणी केली जाते.